शुक्रवारी 28,623 जण कोरोनामुक्त : 592 बळी
प्रतिनिधी / बेंगळूर
राज्यात कोरोनाची दुसरी लाट तीव्र होत असतानाच रुग्ण संसर्गमुक्त होऊन घरी परतण्याचे प्रमाण हळूहळू वाढत आहे. या आठवडय़ात कोरोना रुग्ण उपचाराअंती बरे होण्याचे प्रमाण 22 हजार ते 23 हजारापर्यंत होते. शुक्रवारी त्यात वाढ होऊन हा आकडा 28 हजार पार झाला आहे.
आरोग्य खात्याने प्रसिद्ध केलेल्या हेल्थ बुलेटिननुसार राज्यात मागील चोवीस तासांमध्ये 48,781 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर दिवसभरात 28,623 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. दरम्यान, शुक्रवारी 592 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आतापर्यंतची ही दिवसभरातील उच्चांकी नोंद आहे. तर सक्रिय रुग्णसंख्या 5,36,641 इतकी आहे. मागील चोवीस तासांमध्ये 1,58,902 कोविड चाचण्या करण्यात आल्या आहेत. चाचण्यांच्या तुलनेत पॉझिटिव्ह अहवाल येण्याचे प्रमाण 30.69 टक्के इतके आहे.
राज्यात आतापर्यंत एकूण 18,38,885 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यातील 12,84,420 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर एकूण 17,804 जण दगावले आहेत.









