क्लोजडाऊनचा परिणाम : राज्याची आर्थिक स्थिती आणखी कोलमडली
प्रतिनिधी / बेंगळूर
कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे राज्यात 26 एप्रिलपासून क्लोजडाऊन जारी करण्यात आले होते. परिणामी, राज्याची आर्थिक परिस्थिती आणखी कोलमडली आहे. क्लोजडाऊन घोषित झाल्यापासून आतापर्यंत राज्याला 10 हजार कोटी रुपयांचे नुकसान सोसावे लागले आहे.
राज्य सरकारने आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी यापूर्वीच अनेक जिल्हय़ातील लॉकडाऊनच्या नियमात शिथिलता आणली आहे. तरीही अर्थव्यवस्था सामान्य स्थितीत आणणे शक्य झालेले नाही, असे म्हटले जात आहे. यापूर्वीच मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनीही राज्याची आर्थिक स्थिती नाजूक असल्याचे कबूल केले आहे. कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी सरकारने प्रयत्नांची शर्थ केली आहे. दरम्यान, आर्थिक स्थितीत सुधारणा करण्यात दुर्लक्ष होत आहे. कोरोनावर मात करण्यावर अधिक लक्ष केंद्रीत केलेल्या राज्य सरकारने यापूर्वीच बरीच विकासकामे स्थगित केली आहेत. केवळ तातडीची कामे हाती घेतली जात आहेत.
एका महिन्यात जीएसटीच्या माध्यमातून 10,000 कोटी रुपये उत्पन्न मिळणे आवश्यक होते. मात्र, राज्यातील परिस्थिती बिकट असल्याने नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. 2020-21 सालातील केंद्राकडून मिळणाऱया जीएसटीच्या वाटय़ाची प्रतिक्षा राज्य सरकारला आहे, असे एका अधिकाऱयाने सांगितले आहे. 4,500 कोटी रुपये इतकी ही रक्कम असल्याचे या अधिकाऱयाने सांगितले आहे.
दरम्यान, केंद्र सरकारकडूनही राज्याला अनुदान येणे बाकी आहे. सध्या राज्याची तिजोरी रिकामी झाली आहे. तसेच कर संकलन पूर्णपणे स्थगित झाले आहे. विविध खात्यातील शिल्लक निधीचाही सरकार वापर करीत आहे. राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतर तो निधी परत केला जाईल, असे एका अधिकाऱयाने सांगितले आहे.









