प्रतिनिधी/ रत्नागिरी
कोरोनाचा संसर्ग वाढत असताना बाधित व्यक्ती वेळेत रुग्णालयात दाखल होत नसल्याने मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. गावातील लोक स्थानिक डॉक्टरांचे अधिक विश्वासाने ऐकतात. त्यामुळे गावपातळीवर कार्यरत डॉक्टरांना मार्गदर्शन करण्यासाठी राज्याच्या टास्क फोर्सची कमिटी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हय़ातील तब्बल 1 हजार 900 डॉक्टरांशी व्हीडिओ कॉन्फरन्सव्दारे थेट संपर्क साधणार असल्याची माहिती मंत्री उदय सामंत व खासदार विनायक राऊत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ग्रामीण भागातील लोक वेळेत उपचारासाठी पुढे येत नसल्याची बाब समोर आली असून यासाठी ग्रामीण भागातील डॉक्टरांचे सहकार्य घेण्याचे प्रशासनाने निश्चित केले आहे. या पार्श्वभूमीवर टास्क फोर्सची कमिटी या सर्व डॉक्टरांशी एकाचवेळी संवाद साधणार आहे. डॉक्टर्सना मार्गदर्शन करतानाच त्यांच्या समस्या जाणून घेवून उपाययोजना करणार आहे. याचा मोठा फायदा कोरोना लढय़ात होणार असल्याचा विश्वास यावेळी खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केला. ऑक्सिजन अतिशय कमी होईपर्यंत रूग्ण उपचारासाठी दाखल होत नसल्याची बाब रत्नागिरी जिल्हा टास्क फोर्सच्या समोर आली आहे अशावेळी राज्याच्या टास्क फोर्सचा हा प्रयत्न मोलाचा ठरणार असल्याचे मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
जिल्हय़ात आणखी 2 हजार चाचण्यांसाठी मोबाईल आरटीपीसीआर
रत्नागिरी जिल्हय़ातील वाढत्या रूग्णसंख्येमुळे आरटीपीसीआर अहवाल येण्यास विलंब होत आहे. अहवाल वेळेत मिळावेत, यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या सहकार्याने जिल्हय़ाला एक मोबाईल आरटीपीसीआर प्राप्त झाली असून शुक्रवारी या लॅबचा चिपळूणमधून शुभारंभ होणार आहे. यामुळे आरटीपीसीआरचे अहवाल वेळेत प्राप्त होतील, असा विश्वास उदय सामंत यांनी व्यक्त केला.
..









