ऑनलाईन टीम / लखनऊ :
उत्तरप्रदेशच्या रायबरेलीतील सलोन विधानसभेचे भाजपचे आमदार, माजी मंत्री दल बहादूर कोरी यांचे गुरुवारी रात्री उशिरा कोरोनाने निधन झाले. कोरी यांना दोन आठवडय़ांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर लखनऊच्या अपोलो रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान गुरुवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली.
राम मंदिर आंदोलनात सक्रिय सहभाग असलेल्या कोरी 1996 साली सलोन विधानसभेला निवडून आले. राजनाथ सिंह मुख्यमंत्री असताना त्यांना मंत्रिपदही मिळाले होते. 2004 मध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर 10 वर्षांनी म्हणजेच 2014 साली त्यांची भाजपात घरवापसी झाली. 2017 मध्ये ते पुन्हा भाजपाच्या तिकीटावर सलोन विधानसभेचे आमदार झाले.
कोरी यांच्यापूर्वी उत्तरप्रदेशातील बरेलीच्या नवाबगंजमधील आमदार केसर सिंह गंगवार, ओरैया विधानसभेचे भाजपा आमदार रमेश दिवाकर आणि लखनऊ पश्चिम विधानसभेचे सुरेश श्रीवास्तव यांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे.









