ग्रामपंचायत-ग्रामस्थ पंच कमिटीच्या बैठकीत घेतला निर्णय : स्वयंस्फूर्तीने नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन
वार्ताहर / किणये
सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव ग्रामीण भागातही वाढू लागला आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाला गावातून हद्दपार करण्याच्या दृष्टिकोनातून बेळगुंदी गावातील नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने आठ दिवस कडक क्लोजडाऊन करण्याचे ठरविले आहे. बुधवारी रात्री ग्रामस्थ पंच कमिटी व ग्राम पंचायत यांच्यामध्ये झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढू लागला आहे. ग्रामीण भागात सर्दी, ताप, खोकला आदी रुग्णांच्या संख्येतही वाढ होऊ लागली आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. उपचारासाठी खासगी व सरकारी दवाखान्यांमध्ये नागरिकांच्या रांगा लागल्या आहेत. दवाखान्यांमध्ये रुग्णांची संख्या वाढत असूल्याने नागरिक भयभीत होऊ लागले आहेत. अशा परिस्थितीत नागरिकांचे धैर्य वाढविण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यासाठी बेळगुंदी ग्राम पंचायत व ग्रामस्थ कमिटीतर्फे सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे ठरविले आहे.
भयभीत न होण्याचे नागरिकांना आवाहन
बेळगुंदी गावात सध्या कोरोनाचे चार रुग्ण आढळून आले आहेत. त्यांना सध्या होमक्वारंटाईन करून उपचार सुरू असल्याची माहिती ग्राम पंचायत अध्यक्षा हेमा हदगल यांनी दिले. या चारही कोरोना रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा होत असून नागरिकांनी भयभीत होऊ नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
बुधवारी रात्री येथील लक्ष्मी मंदिरात ग्रामस्थ कमिटीचे अध्यक्ष सोमाण्णा गावडा व सर्व सदस्य तसेच ग्राम पंचायत सदस्य प्रताप सुतार, कल्लाप्पा ढेकोळकर, राजू किणयेकर, महादेव पाटील, सुभाष हदगल आदींची बैठक झाली. बैठकीत शनिवार दि. 8 मे रोजीपासून 15 मेपर्यंत गावातील सर्व व्यवहार, दुकाने बंद ठेवून कडक क्लोजडाऊन करण्याचे ठरविण्यात आले आहे. हा निर्णय कोरोनाची साखळी तोडण्यासाठी घेण्यात आला असून नागरिकांनी याला सहकार्य करावे, असे आवाहनही केले आहे.
सहय़ाद्रीच्या डोंगरपायथ्याशी निसर्गरम्य वातावरणात बेळगुंदी हे गाव वसलेले आहे. या गावच्या बाजूला मार्कंडेय नदी वाहते तसेच गावच्या आजूबाजूला हिरवेगार शेतशिवार आहे. त्यामुळे इथले सौंदर्य अनेकांना भुरळ घालते. बेळगुंदी गावची लोकसंख्या सुमारे 6 हजार इतकी आहे.
महाराष्ट्रातील लोक बाजारपेठेसाठी बेळगुंदीत
तालुक्मयाच्या पश्चिम भागातील बेळगुंदी हे गाव बाजारपेठेसाठी महत्त्वाचे मानले जाते. या गावात विविध प्रकारची दुकाने आहेत. सध्या महाराष्ट्रात कडक क्लोजडाऊन असल्यामुळे तुडये व शिनोळी परिसरातील काही नागरिक बेळगुंदीला खरेदीसाठी येऊ लागले आहेत. भविष्यात बेळगुंदी गावातही कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ नये यासाठी ग्रामस्थांनी एकमताने आठ दिवस क्लोजडाऊन करण्याचा निर्णय घेतलेला आहे.
गेल्या वषीपासून देशासह तालुक्मयात कोरोनाच्या प्रादुर्भावाला सुरुवात झाली. गतवषी प्रारंभी हिरेबागेवाडी येथे कोरोनाचे रुग्ण सापडले. त्यानंतर बेळगुंदी गावात कोरोनाचा एक रुग्ण सापडला होता. यावेळी गावामध्ये पूर्णपणे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. गाव सीलबंद करण्यात आला होता. आठ दिवस कडक पोलीस बंदोबस्त ठेवला होता. गावातील वातावरण शुद्ध असल्यामुळेच गेल्यावषी 70 वर्षांचा कोरोनारुग्णही या आजारातून बरा झाला. दि. 22 मार्च 2020 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक दिवसाचा जनता कर्फ्यू जाहीर केला. त्याला संपूर्ण देशातून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मात्र, कोरोनाचा फैलाव वाढू लागल्यामुळे गेल्यावषी प्रशासनाला लॉकडाऊन करावे लागले. गेल्या दोन-तीन महिन्यापूर्वी देशासह राज्यात चित्र वेगळे होते. कोरोना हद्दपार झाला असेच साऱयांना वाटत होते. मात्र, गेल्या महिनाभरापासून कोरोनाची दुसरी लाट आली अन् सर्वांना सतर्क राहून आरोग्य सांभाळण्याची गरज निर्माण झाली आहे.
तालुक्यात रुग्ण संख्येत वाढ
गेल्या आठ दिवसांपासून तालुक्मयाच्या अनेक गावांमध्ये कोरोना रुग्ण आढळून येऊ लागले आहेत. यापूर्वी ग्रामीण भागात कोरोना रुग्ण अगदीच कमी प्रमाणात आढळले होते. मात्र, अलीकडे काही गावांमध्ये दोन ते चार किवा त्याहीपेक्षा अधिक प्रमाणात रुग्ण आढळून येऊ लागल्यामुळे आता साऱयांनाच या कोरोनाची धास्ती लागून राहिली आहे.सध्या जीवनावश्यक साहित्याची दुकाने दुपारी 12 पर्यंत चालू आहेत. त्यानंतर पूर्णपणे क्लोजडाऊन सुरू आहे. प्रशासन आपल्यापरीने प्रयत्न करीत आहे. मात्र, आता समाजातील प्रत्येक घटकानेही कोरोनावर मात करण्यासाठी वेगवेगळय़ा पद्धतीने प्रयत्न करण्याची गरज निर्माण झाली असून पश्चिम भागातील बेळगुंदी गावाने स्वयंस्फूर्तीने आठ दिवसांचा क्लोजडाऊन जाहीर केला आहे.
बाहेरील कामगारांनाही गावात प्रवेश बंदी
सध्या गावात अनेक ठिकाणी घरबांधणीची कामे सुरू आहेत. यासाठी बाहेरगावातील कामगारवर्ग येऊ लागला आहे. या आठ दिवसांत बाहेरील कामगारांनाही प्रवेश दिला जाणार नाही, असेही सांगण्यात आले आहे.









