प्रतिनिधी / कोल्हापूर
मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी राज्य घटनेत दुरूस्ती हा एकमेव पर्याय आहे. त्यासाठी राज्य आणि केंद्रस्तरावर संघटितपणे लढा देण्याबरोबर पाठपुरावा करण्याची गरज आहे, असे स्पष्ट मत श्रीमंत छत्रपती शाहू महराज यांनी व्यक्त केले.
सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी मराठा आरक्षण रद्दचा निकाल दिल्यानंतर मराठा समाजातील युवक, युवतींमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमठत आहेत. या पार्श्वभूमीवर शाहू महाराज यांची प्रतिक्रिया जाणून घेतली. ते म्हणाले, मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी जो निकाल दिला तो अपेक्षित होता. मात्र मराठा समाजाला यापुढे न्याय मिळवायचा असेल तर संघटीतपणे प्रयत्न करावे लागतील. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचा संपूर्णपणे अभ्यास करून त्यानंतर कायदेशीर आणि घटनात्मक बाबी, तरतुदींचा अभ्यास करून आरक्षणाची पुढील लढाई लढावी लागेल.
या लढय़ात सर्व जाती, धर्माच्या बांधवांना सहभागी करून घेण्याची गरज आहे. राज्य सरकारने दिलेले आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द ठरविल्यानंतर आता ते मिळविण्यासाठी असणाऱया कायदेशीर आणि घटनात्मक बाबींचा अभ्यास करून पुढील रणनीती, धोरण, भूमिका घ्यावी लागेल. घटना दुरूस्ती हा एकमेव पर्याय असल्याने हा प्रश्न आता महाराष्ट्रापुरता मर्यादित नाही तर देशव्यापी झाला आहे.
घटना दुरूस्ती करताना सर्व राजकीय पक्षांच्या संसदेतील खासदारांना एकत्रित आणवे लागेल. यासाठी राज्य आणि केंद सरकराच्या स्तरावर प्रयत्न होण्यासाठी मराठा संघटनांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. संसदेतील दोन तृतीयांश मतदानाशिवाय कोणतीही घटनादुरूस्ती होत नाही. त्यामुळे केंद्राबरोबर राज्य सरकारांची भूमिका पातळीवर महत्वाची ठरणार आहे. ही बाब लक्षात घेऊन पाठपुरावा करण्यात यावा, आरक्षणाची लढाई कठिण असली तरी अशक्य नाही, असेही श्रीमंत शाहू महाराज यांनी सांगितले.