आज 5 मे-जागतिक व्यंगचित्रकार दिन! यानिमित्त काही आगळा-नेहमीपेक्षा वेगळा असा कार्यक्रम करावा, अशी सूचना ज्ये÷ व्यंगचित्रकार प्रशांत कुलकर्णी यांनी मांडली. आपल्या आवडत्या व्यंगचित्रकारांच्या कोणत्याही दोन व्यंगचित्रांचे रसग्रहण करायचे. त्याबद्दल बोलायचे किंवा लेख स्वरुपात प्रसिद्धी द्यायची. त्यानिमित्ताने व्यंगचित्रांची ताकद सर्वांना कळावी. त्यांचे महत्त्व अधोरेखीत व्हावे. त्यांचा प्रचार-प्रसार व्हावा. नव्या लोकांना त्यातून स्फूर्ती मिळावी-दिशा दिसावी. कार्टूनिस्ट कंबाईनचे अध्यक्ष संजय मिस्त्राr यांनी ही कल्पना उचलून धरली आणि सर्व मराठी व्यंगचित्रकाराना आवाहन केले की आपापल्या पद्धतीने आपल्या आवडत्या माध्यमाद्वारे-प्रिंट मीडिया, डिजिटल मीडियाद्वारे आपले विचार मांडावेत. त्याचाच एक भाग म्हणून हे लेखन. मला आवडलेल्या दोन व्यंगचित्रात मी एका राजकीय व्यंगचित्राची आणि एका सामाजिक हास्यचित्राची निवड केली आहे.
पहिले चित्र आहे ते ज्ये÷ व्यंगचित्रकार सुरेश लोटलीकर यांचं. मूळचे ते गोव्याचे, पण आता वास्तव्य पुण्यात. ते बंडखोर विचारांचे व्यंगचित्रकार आहेत. त्यांची सर्वच चित्रे वेगळय़ा पद्धतीची-वेगळय़ा विचारसरणीची! चित्रशैलीही अनकॉमन अशी-स्वतंत्र, स्वतःची! त्यांच्या चित्रातली पात्रे बुटक्मया आकाराची असतात आणि ते शेडींगचा भरपूर वापर करतात.

‘पुलं आणि आम्ही’ या नावाचे पु. ल. देशपांडे यांच्यावरील व्यंगचित्रांचे अख्खे पुस्तकच त्यांनी तयार केले आहे ही गोष्टच त्यांच्या वेगळेपणाची साक्ष देणारी! त्यांचे एक चित्र मला विशेष भावले आणि त्यामुळे ते कायमचे लक्षात राहिले. खूप वर्षांपूर्वी कोणत्या तरी एका मासिकात ते छापून आले होते. त्यावेळी मी त्याचे कात्रणही काढून जपून ठेवले होते. पण अगदी जपून ठेवलेल्या वस्तू नंतर हमखास गायब होतात. तसाच प्रकार या चित्राबाबतही झाला. काळाच्या ओघात ते कुठे गेले ते काही समजले नाही. सुरेश लोटलीकर यांच्याजवळ मी या चित्राचा उल्लेख केला. तेव्हा ते चित्र त्यांच्याजवळही नाही, हे समजले. उलट तुम्हाला मिळालेच तर मलाही त्याची कॉपी पाठवा, असे ते म्हणाले.
भ्रष्टाचार हा विषय आपल्याला नवा नाही. किंबहुना तो तसा नवा विषयच नाही. अनादी अनंत काळापासून तो समाजाचा सोबती आहे. पण अलीकडच्या काळात तो ‘कोरोना’ प्रमाणे इतक्मया झपाटय़ाने पसरत गेला की तो आता सर्वक्यापी होऊन राहिला आहे. कोणत्याही सरकारी खात्यात तो हमखास असतोच. खाजगी आस्थापनातही तो वेगवेगळय़ा स्वरुपात (म्युटंट) बस्तान बसवून आहे. एवढेच नव्हे तर आपल्या घरीदारी, जीवनाच्या अंग-प्रत्यंगात भ्रष्टाचाराने अढळ स्थान मिळवले आहे. लष्कर आणि न्यायालये तरी त्यापासून अलिप्त असतील असे वाटले होते. पण तेथेही या ‘कॅन्सर’ने आपले बस्तान बसविले आहे. न्यायदेवता आंधळी असते, हे आपणा सर्वांना माहीत आहे. पण ती कशी आंधळी आहे, हे लोटलीकरांनी आपल्या व्यंगचित्रात अतिशय मार्मिकपणे दाखवले आहे. ते चित्र उपलब्ध नाही. पण मीच ते चित्र पुन्हा एकदा रेखाटले आहे. हेच ते व्यंगचित्र!

हे चित्र नीट निरखून पाहिल्यावर आपल्याला धक्काच बसतो. न्यायदेवता आंधळी असते. कारण तिने आपले डोळे बांधून घेतलेले असतात. हातात तराजू असतो. दोन्ही पारडी समसमान असतात. कुणावरही अन्याय होता कामा नये हा उद्देश. पण या चित्रात लोकांनी न्यायदेवतेचे डोळे कशा पद्धतीने बांधले आहेत हे पाहिल्यावर धक्का, आश्चर्य, खेद, एकूण व्यवस्थेबद्दल निराशा, वैफल्य अशा भावना उचंबळून वर येतात. चक्क पैशाच्या म्हणजे नोटांच्या थप्प्यांनी तिचे डोळे बांधले आहेत. आता काय बोलायचे? एकच चित्र, पण संपूर्ण व्यवस्थेवर झगझगीत प्रकाश टाकणारे-डोळय़ात अंजन घालणारे! व्यवस्थेचे वाभाडे काढणारे. सुरेश लोटलीकर बंडखोर विचारांचे आहेत, असे मी सुरुवातीला म्हणालो ते याचमुळे! इतका घणाघाती प्रहार कुणी केला नसेल. हे चित्र कायमचे लक्षात राहिले ते त्याचमुळे. सुरेश लोटलीकर यांच्या बंडखोरीला सलाम! आजच्या काळात असे चित्र तरी काढता येईल का ही शंका आहेच, न्यायालयाचा अवमान व्हायचा!
मला आवडलेले दुसरे चित्र आहे, सुप्रसिद्ध हास्यचित्रकार शि. द. फडणीस यांचे. आज वयाच्या 95 व्या वषीही ते कार्यरत आहेत. त्याचे रहस्य त्यांच्यातला मिष्किलपणा, निर्विष विनोदबुद्धी आणि सौंदर्यदृष्टी हेच असावे. त्यांचे हे चित्र मला खूप आवडते.
या चित्राबद्दल फारसे बोलावेच लागत नाही. निखळ हास्य फुलविणारे अतिशय बोलके असे हे चित्र फडणीसांच्या ‘हसरी गॅलरी’ या पुस्तकात आहे. मानवी स्वभावाचे सुरेख दर्शन घडवते ते! त्या छोटय़ा मुलाच्या चेहऱयावरील भाबडे भाव तरी बघा. रडल्यावर आई खाऊ, खेळणी देते हे माहीत असलेला छोटू आता पालकाच्या भूमिकेत शिरून आई जेव्हा ‘रडायला’ (गायला) लागते तेव्हा पटकन् आपली खेळणी, चॉकलेटं तिला देऊ करतो. साधीच गोष्ट, पण हसू फुटल्याशिवाय रहात नाही. शि. दं. ची सर्वच चित्रे अशी निखळ हसू फुटविणारी-बिनविखारी- आपल्या आजूबाजूला घडणाऱया सामान्य घटनांमधून विनोद टिपणारी-मानवी स्वभावाचे दर्शन घडविणारी, तेही शब्दांची मदत न घेता. त्यामुळे युनिव्हर्सल अपिल असणारी. भौगोलिक, भाषिक सीमा ओलांडणारी. फडणीसांची चित्रे पाहिल्यावर हसू तर येतेच पण मनही प्रसन्न होते.
जगदीश कुंटे








