बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने बऱ्याच ठिकाणी बेडची कामतरता भासत आहे. अनेक रुग्णांना बेड मिळत नसल्याने ताटकळत थांबावे लागत आहे. यापार्श्वभूमीवर बीबीएमपीच्या मुख्य आयुक्तांनी खासगी रुग्णालयांना रुग्णालयात बेडचे तपशील दर्शविण्याचे आदेश दिले होते. जर तपशील न दिल्यास संबंधित रुग्णालयावर कारवाई करण्याचा इशारा दिला होता. यांनतर आता खाजगी रुग्णालयांमध्ये खाजगी कोट्या अंतर्गत बेडच्या स्थितीविषयी माहितीसाठी एक पोर्टल सुरू केले. बृह बेंगळूर महानगर पालिकेच्या (बीबीएमपी) आदेशानुसार, बेंगळूरमधील खासगी रुग्णालये आणि नर्सिंग होम असोसिएशनने (पीएचएएनए) खासगी रुग्णालयात बेडच्या उपलब्धतेविषयी माहिती देणारे ‘सर्च माय बेड’ पोर्टल सुरू केले आहे.
या पोर्टलवर खासगी कोट्या अंतर्गत खासगी रुग्णालयात दाखल झालेल्या कोविड रूग्णांची संख्या, बेडची उपलब्धता, संपर्क क्रमांक आणि रुग्णालयांची माहिती मिळेल. डेटा योग्य वेळेत अपलोड केला जाईल, असे बीबीएमपीने एका निवेदनात म्हटले आहे. सेंट्रल बेड मॅनेजमेंट सिस्टमच्या बीबीएमपी मर्यादेत सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये ११ हजार बेड असून गेल्या पाच दिवसांपासून या यंत्रणेमार्फत सुमारे ५,०१३ बेडचे वाटप करण्यात आले आहे.
शहरातील केपीएमई अंतर्गत नोंदणीकृत सर्व खाजगी रुग्णालयांमध्ये फक्त शासकीय कोट्याखालील बेडची माहिती उपलब्ध असून खाजगी कोट्याची कोणतीही माहिती उपलब्ध नाही. कोविड १ ९ रूग्ण ज्यांना खाजगी कोट्यातून उपचार घ्यायचे आहेत त्यांची माहिती घेता येत नाही. या संदर्भात कोरोना संक्रमित खासगी कोट्यात बेडचा दर्जा उपलब्ध करुन देण्यासाठी खासगी रुग्णालये व नर्सिंग होम असोसिएशनने ‘सर्च माय बेड’ पोर्टल सुरू केले आहे, ”असे निवेदनात म्हटले आहे.









