बंगालमध्ये तृणमूलच्या विजयाची पटकथा लिहिणारा तज्ञ -आता वेगळे काही तरी करणार
वृत्तसंस्था / कोलकाता
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचा पक्ष तृणमूल काँग्रेसचे निवडणूक व्यूहनीतिकार राहिलेले प्रशांत किशोर यांनी निवडणूक व्यवस्थापनाचा स्वतःचा पेशा सोडून देण्याचा निर्णय घेतला आहे. बंगाल विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यावर पीके यांनी ही घोषणा केली आहे. आपण आता काहीतरी वेगळे करू इच्छितो असे त्यांनी म्हटले आहे. तृणमूल काँग्रेसची निवडणूक व्यूहनीति आखण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. याच्या बळावर ममता बॅनर्जी यांचा सत्ता राखण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
निवडणूक व्यवस्थापन आणि आयपॅक सोडत आहे, कारण आता काहीतरी वेगळे करू इच्छितो. पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूत माझ्या निवडणूक व्यवस्थापनात लढविल्या गेलेल्या निवडणुकीत तृणमूल काँग्रेस आणि द्रमुकच्या विजयाने अत्यंत आनंदी आहे. याचबरोबर पश्चिम बंगालमध्ये भाजप दुहेरी आकडय़ापुरती मर्यादित राहणार असल्याचा दावा खरा ठरल्यानेही आनंद झाल्याचे पीके यांनी रविवारी म्हटले आहे.
मी कधीच निवडणूक व्यवस्थापनाचे काम करू इच्छित नव्हतो. पण मी या क्षेत्रात आलो आणि माझ्या वाटय़ाचे काम केले. आयपॅकमध्ये माझ्याहून अधिक सक्षम लोक आहेत, ते अधिक चांगले काम करतील. आगामी काळात काय करावे याचा निर्णय लवकरच घेणार आहे. निवडणूक व्यवस्थापनाचे काम सोडून देण्याचा विचार दीर्घकाळापासून करत होतो, असे पीके यांनी सांगितले आहे. राजकारणात प्रवेश करणे नेहमीच माझ्या रडारवर झाले आहे. राजकारणातील माझा प्रवेश अपयशी ठरला असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.









