प्रतिनिधी / मिरज
एकाच कुटुंबांतील तिघेजण उपचार घेत असताना त्यापैकी एका महिलेचा मृत्यू झाला आणि त्यानंतर दोन लाख, 75 हजार रुपयांचे बिल भरण्यासाठी रुग्णालय प्रशासनाने मृतदेह देण्यास नकार दिल्याने संतप्त झालेल्या नातेवाईकांनी सांगली-मिरज रस्त्यावरील एका खासगी कोविड हॉस्पिटलची तोडफोड केली. रविवारी दुपारी बाराच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान, आमदार गोपीचंद पडळकर यांच्या मध्यस्थीनंतर प्रकरण मिटल्याने नातेवाईकांनी पेलिसांत तक्रार दिली नाही.
सांगली-मिरज रस्त्यावरील एका खासगी कोविड हॉस्पिटलमध्ये एकाच कुटुंबातील तिघेजण दाखल झाले होते. गेल्या दोन दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र, त्याच कुटुंबातील एका महिलेचा शनिवारी रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला. रविवारची सकाळ उजाडली तरी नातेवाईकांकडे मृतदेह दिला नव्हता. त्यांना भेटूही दिले नव्हते. दोन लाख, 75 हजार रुपयांचे बिल भरण्यासाठी मृतदेह ताब्यात देण्यास रुग्णालय प्रशासनाने टाळाटाळ केली, असा आरोप नातेवाईकांनी केला. संतप्त झालेल्या नातेवाईकांनी रुग्णालयाची तोडफोड केली.
दरम्यान, घडल्याप्रकरानंतर महात्मा गांधी चौकी पोलिसांनी रुग्णालयाकडे धाव घेतली. त्यावेळी आमदार गोपीचंद पडळकर यांनी मध्यस्थी करुन प्रकरण मिटविले. त्यामुळे नातेवाईकांनी रुग्णालयाच्या विरोधात पोलिसात तक्रार दिली नसल्याची माहिती महात्मा गांधी चौकी पोलिसांनी दिली आहे.