80 च्या दशकात शोले नावाचा चित्रपट प्रचंड गाजला होता. त्यातील जय आणि विरू (अमिताभ बच्चन आणि धर्मेंद) ही जोडी तर तरुणांच्या गळय़ातील कंठमनी बनली होती. आजच्या कोरोनाच्या काळात नोयडा येथे देवेंद्र आणि रंजन या दोन युवकांची जोडी कोरोनाविरुद्धच्या लढाईसाठी अशीच प्रसिद्ध झाली आहे.
देवेंद्र आणि रंजन यांची ही कथा देखील बोकारोमधीलच आहे. रंजन हा काही दिवसांपूर्वी कोरोनाबाधित झाला होता. कोरोनाबाधित व्यक्तीच्या जवळ येण्यासाठी लोक कचरतात, तेथे साहाय्य तर दूरच राहिले. तथापि देवेंद्रने आपल्या जीवलग मित्रासाठी तो धोका पत्करला. आपल्या मित्रासाठी त्याने असे काम करून दाखविले की ज्याची कल्पनाही त्यांचे नातेवाईक किंवा गावातील इतर लोक करू शकले नसते. रंजन याला श्वास घेण्यास त्रास सुरू झाल्याने त्वरित ऑक्सिजन देण्याची आवश्यकता होती. तथापि आसपास कोठेही आणि जवळच्या शहरांच्या ठिकाणीही ऑक्सिजन मिळू शकत नव्हता. अशावेळी देवेंद्रने आपल्या वाहनातून 1400 कि.मी. चा प्रवास करून ऑक्सिजन सिलिंडर आणला. अवघ्या दोन दिवसात त्याने हा प्रवास पूर्ण करत आपल्या मित्रासाठी जणू त्याचे जीवनच परत आणले. ऑक्सिजन मिळताच रंजनची प्रकृती झपाटय़ाने सुधारू लागली. अलीकडच्या काळात असे मित्रप्रेम पाहावयासही मिळत नाही. या दोघांच्याही मैत्रीची कौतुकभरी चर्चा सध्या सोशल मीडियावरही जोरदारपणे सुरू आहे.









