चार केंद्रांतून परवानगी देण्यास मुभा, तहसीलदार कार्यालयात परवानगीसाठी वाढतेय गर्दी, तातडीने परवानगी देण्यास विलंब होत असल्याने संताप
प्रतिनिधी / बेळगाव
विवाहाच्या हंगामातच कोरोना सक्रिय होताना दिसत आहे. त्यामुळे बोहल्यावर चढणाऱया वधू-वरांची मागील वर्षापासून मोठी कोंडी निर्माण झाली आहे. कोरोनाचे जाचक नियम पाळत विवाह करायचा म्हटले तरी हौसेला प्रत्येकाला मुरड घालावी लागत आहे. मात्र, विवाह ठरल्यामुळे विवाह उरकून घेण्यातच साऱयांना धन्यता मानावी लागत आहे. त्यामुळे कोरोनाचे नियम पाळतो, पण शुभमंगल करण्यासाठी आम्हाला परवानगी द्या, असे तहसीलदारांकडे साकडे घालण्यात येत आहे. कोरोनाकाळातही बेळगाव तालुक्मयात 648 विवाहांना बुधवारपर्यंत परवानगी देण्यात आली आहे.
काहीजण विवाह मोठय़ाने करायचा आहे म्हणून पुढे ढकलण्याच्या प्रयत्नात आहेत. विवाहासाठी मंगल कार्यालय बुकिंग केले होते. त्यासाठी आगाऊ रक्कम देण्यात आली आहे. त्यामुळे काही जणांचे मन विचलित होताना दिसत आहे. कोरोनाचे नियम पाळायचे की हौसेने लग्न करायचे, या विवंचनेत अनेकजण अडकले आहेत. काही जणांना तर पश्चाताप होण्याची वेळ आली आहे.
विवाह म्हणजे दोन जीवांच्या नवीन आयुष्याची सुरुवात. मात्र, कोरोनाच्या संकटाशी सामना करत नवीन आयुष्याला सुरुवात करावी लागत असल्याच्या प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. विवाहासाठी लहान कार्यालयांमध्ये 25 जणांना मुभा तर खुल्या जागेत विवाह असेल तर 50 जणांना परवानगी यामुळे कोणाला आमंत्रण द्यायचे आणि कोणाला नको? असा प्रश्नदेखील निर्माण झाला आहे. महत्त्वाचे म्हणजे लग्न म्हटले की मान-पान आला. बऱयाचवेळा आपला मान-पान झाला नाही म्हणून तक्रारी करणारी बरीच मंडळी असते. मात्र, या कोरोनाकाळात मानपान बाजूला असू दे, मात्र त्या 50 जणांच्या यादीमध्ये माझे नाव आहे की नाही, याचीच चाचपणी करावी लागत आहे.
लग्न म्हटले की आमंत्रण देण्यासाठी महागडय़ा लग्नपत्रिका. त्यामध्ये आग्रहाचे आमंत्रण. मात्र या नियमांमुळे लग्नपत्रिका तरी नाहीतच शिवाय आग्रहाचे आमंत्रणही देणेही अशक्मय झाले आहे. याआधी लग्नाला या म्हणून आग्रह करणारे आता बाबा विवाहानंतर एखादा कार्यक्रम करू त्या कार्यक्रमामध्ये तुम्ही आवर्जून या, असे सांगून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न सुरू आहे.
परवानगीबाबत निर्णय देण्यास लागतोय उशीर कोरोनाकाळात बेळगाव तालुक्मयातील विविध भागांतून विवाहासाठी अनेकांनी अर्ज केले आहेत. मात्र, यावर निर्णय उशिरा देण्यात येत आहेत. लग्नाची तारीख आहे त्या आधी एक दिवस परवानगी देण्यात येत आहे. त्यामुळे तणावाखालीच वधू-वरांची मंडळी लग्नाचे आयोजन करताना दिसत आहे. आम्हाला परवानगी मिळेल ना, अशी विचारणा ते वारंवार करत आहेत. त्यामुळे शुभमंगल म्हणजे सावधान म्हणण्याची वेळ आता साऱयांवर येऊन ठेपली आहे. कारण 25 पेक्षा अधिक जण उपस्थित राहिले तर वधू-वरांसह त्यांच्या कुटुंबीयांवर गुन्हा दाखल होत आहे. त्यामुळे सावधान होऊनच लग्न पार पाडण्याची जबाबदारी साऱयांवर आली आहे.
कोरोनामुळे विवाह सोहळय़ातील ओठावरील लाली गायब
विवाह सोहळा म्हटले की नट्टापट्टा हा ठरलेलाच असतो. वधूपेक्षाही करवली असू दे किंवा वधू-वरांच्या बहिणी व नातेवाईक असू देत, ते नटण्यासाठी धडपडत असतात. हातावर मेहंदी, ओठावर लाली, केसांमध्ये गजरा हा ठरलेला असतो. मात्र, कोरोनामुळे तोंडावर मास्क घालावा लागल्यामुळे ओठावरील लाली मात्र विवाह सोहळय़ातून गायब होताना दिसत आहे.
ओठाला लाली लावल्यानंतर मास्क घालणार कसा? असा प्रश्न अनेकांना निर्माण झाला आहे. विवाहासाठी सरकारने नियमावली जाहीर केली आहे. त्यामध्ये तोंडावर मास्क, सोशल डिस्टन्स आणि सॅनिटायझर हा वापरलाच पाहिजे. त्यामुळे महिलावर्गाला त्याची मोठी अडचण निर्माण झाली आहे. विवाह म्हटले की आनंदाचा क्षण. आपल्या मुली किंवा आपल्या घरातील महिला आजचा दिवस नट्टापट्टा करू देत, अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. पण या नियमांपुढे या इच्छेला मुरड घालावी लागत आहे.
विवाहाच्या मुहूर्तावेळी वधूकडील मंडळी वधूच्या शेजारी थांबून फोटोसेशन करत असतात. वराकडील मंडळीही फोटोसेशनसाठी सरसावलेली असते. आता सोशल डिस्टन्स ठेवावे लागल्यामुळे फोटोसेशनही बऱयाच प्रमाणात कमी झाले आहे. कोरोनाच्या नियमानुसार नातेवाईक असू दे किंवा वधू-वरानेही सोशल डिस्टन्स ठेवायचा आहे. त्यामुळे वधू-वरांनाही या नियमांचा फटका बसू लागला
आहे.
सध्याची तरुणाई तर विवाह ठरल्यानंतर प्रि-वेडींगच्या नावाखाली फोटोसेशन आणि व्हिडिओग्राफी करत आहेत. जणू चित्रपटामध्ये ज्या पद्धतीने विवाह सोहळा साजरा केला जातो त्या पद्धतीनेच लग्नापूर्वी अल्बम व व्हिडिओ तयार करून तो लग्नामध्ये मोठय़ा हौसेने सर्वांसाठी एका मोठय़ा स्क्रीनवर प्रसारित केला जात
आहे.
मात्र कोरोनामुळे प्रि-वेडींगही बंद झाल्याने अनेकांचा हिरमोड झाला आहे. ओठावरील लाली आणि प्रि-वेडींग कोरोनाच्या कचाटय़ात अडल्यामुळे कोरोनाच्या नावाने नियोजित वधू-वरांसह त्यांचे नातेवाईकही अक्षरशः शिमगा करताना दिसत आहेत.
कोरोनाचे कठोर नियम पाळत विवाह करा
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे प्रत्येकाने कोरोनाचे नियम पाळणे काळाची गरज आहे. आपल्या एका चुकीमुळे अनेक जण या आजाराला बळी पडू शकतात. तेव्हा स्वतःचा कोरोनापासून बचाव करणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी कोरोनाचे नियम पाळणे गरजेचे आहे. विवाह असला तरी तोंडाला मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्स ठेवून करा, असे आवाहन त्यांनी केले आहे.
– उपतहसीलदार व्ही. मोहन
बेळगाव तालुक्मयातून आलेल्या अर्जांची आकडेवारी
तालुक्मयातील नेम्मदी केंद्रांमध्ये दाखल झालेले अर्ज | आतापर्यंत परवानगी दिलेली आकडेवारी |
बेळगाव | 192 |
हिरेबागेवाडी | 184 |
उचगाव | 147 |
काकती | 125 |
एकूण | 648 |