पंजाबच्या मुख्यमंत्र्यांकडून कुटुंबीयांना मदत जाहीर
@ वृत्तसंस्था / लेह
सियाचीनच्या सब सेक्टर हनीफमध्ये हिमस्खलनाच्या तावडीत सापडून पंजाब रेजिमेंटचे दोन सैनिक हुतात्मा झाले आहेत. तर अडकून पडलेले अनेक सैनिक आणि पोर्टर यांना वाचविण्यात आले आहे. पंजाबच्या मानसा जिल्हय़ातील प्रभजीत सिंग तसेच बरनाला येथील अमरदीप सिंग यांना हौतात्म्य प्राप्त झाले आहे. हुतात्म्यांचे पार्थिव मंगळवारी त्यांच्या गावांमध्ये पोहोचले.
पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी 21 पंजाब रेजिमेंटच्या दोन्ही हुतात्मा सैनिकांच्या कुटुंबीयांना मदत जाहीर केली आहे. दोन्ही सैनिकांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 50 लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात येणार आहे. याचबरोबर कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरी देण्याचीही घोषणा करण्यात आली आहे.
सैन्याच्या सूत्रांनुसार रविवारी दुपारी एक वाजता हिमस्खलन झाले. सैन्याचे बचावपथक तत्काळ तेथे पोहोचले. सैनिक आणि पोर्टरांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. पण दोन सैनिकांना वाचविण्यास यश आले नाही
सियाचीन ग्लेशियर समुद्रसपाटीपासून 5400 मीटरच्या उंचीवर आहे. भारत-पाकिस्तानला लागून असलेल्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर सियाचीन ग्लेशियर सामरिकदृष्टय़ा अत्यंत महत्त्व बाळगून आहे. ऑपरेशन मेघदूतच्या माध्यमातून पाकिस्तानवर मात करत भारताने 13 एप्रिल 1984 रोजी सियाचीनवर नियंत्रण प्रस्थापित केले होते. येथे भारतीय सैन्याच्या अनेक चौक्या असून ज्या 6400 मीटरच्या उंचीवर आहेत.









