ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले असून, रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे देशात कारोना उपचारांसाठी वापरण्यात येणारे ‘रेमडेसिवीर’ इंजेक्शन, ऑक्सिजन आणि इतर वैद्यकीय उपकरणांची कमतरता भासत आहे. या संकटात भारताला मदतीचा हात म्हणून इंग्लंडने पाठविलेल्या व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची पहिली खेप भारतात पोहचली आहे. इंग्लंडने भारताला 95 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर, 120 नॉन इन्हेसिव्ह व्हेंटिलेटर आणि 20 मॅन्युअल व्हेंटिलेटर पाठविले आहेत.
इंग्लंडचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन म्हणाले, कोरोनाविरोधातील लढाईत भारताला मदत करण्यासाठी 600 हून अधिक महत्वाची वैद्यकीय उपकरणे भारतात पाठविण्याचा निर्णय मागील आठवडय़ात घेण्यात आला होता. त्यानुसार या उपकरणांची पहिली खेप भारतात दाखल झाली आहे. पुढील आठवडय़ात उपकरणांची दुसरी खेप भारतात पोहचेल. कठीण प्रसंगात इंग्लंड एका मित्राच्या रुपात भारताच्या पाठीशी उभा राहिल.