खासगी इस्पितळातील तिघा कर्मचाऱयांना अटक : सीसीबीची कारवाई : काळाबाजार रोखण्यासाठी उपाययोजना सुरू
प्रतिनिधी / बेळगाव
कोरोना रुग्णांवर उपचारासाठी आवश्यक असलेल्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठय़ा प्रमाणात तुटवडा आहे. त्यामुळे काळय़ा बाजारात या इंजेक्शनची विक्री करण्यात येत असून या प्रकरणी खासगी इस्पितळात काम करणाऱया तिघा परिचारकांना सीसीबी पोलिसांनी सोमवारी अटक केली.
पोलीस आयुक्त डॉ. के. त्यागराजन यांच्या मार्गदर्शनाखाली सिटी क्राईम ब्रँचचे पोलीस निरीक्षक निंगनगौडा पाटील व त्यांच्या सहकाऱयांनी ही कारवाई केली असून अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून रेमडेसिवीरच्या तीन बाटल्या, एक दुचाकी, दोन मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. माळमारुती पोलिसात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
मंजुनाथ दुंडाप्पा दानवाडकर (वय 35, मूळचा रा. रामापूर, जि. बागलकोट, सध्या रा. समर्थ गल्ली-शाहूनगर), संजीव चंद्रशेखर माळगी (वय 33, मूळचा रा. नयानगर, ता. बैलहोंगल, सध्या रा. शिवाजीनगर) अशी अटक करण्यात आलेल्या दोघा जणांची नावे आहेत. या दोघा जणांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी महेश केंगलगुत्ती (वय 33, रा. वैभवनगर) यालाही अटक केली आहे. क्राईम ब्रँचने केलेल्या या कारवाईचे पोलीस आयुक्तांनी कौतुक केले आहे.
बेळगावातही रेमडेसिवीरची काळय़ा बाजारात विक्री सुरू असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी खासगी इस्पितळांत काम करणाऱया दोघा परिचारकांशी संपर्क साधून त्यांच्याकडे इंजेक्शनची मागणी करण्यात आली. त्यांनी सांगितलेली रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली. त्यानंतर एका हॉटेलजवळ येऊन इंजेक्शन देताना त्या दोघा जणांना अटक करण्यात आली.
एका इंजेक्शनची किंमत 3 हजार 400 रुपये इतकी असली तरी 25 ते 30 हजार रुपयांना एका इंजेक्शनची विक्री करण्यात येत होती. रेमडेसिवीरचा काळाबाजार रोखण्यासाठी प्रशासनाने व्यापक उपाययोजना सुरू केली असली तरी खासगी इस्पितळांतील कर्मचारी मोठय़ा प्रमाणात इंजेक्शनचा काळाबाजार करताना दिसून येत आहेत. असे प्रकार आढळून आल्यास पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन पोलीस आयुक्तांनी केले आहे.









