दिवसभरात 10,663 जण संसर्गमुक्त
बेंगळूर : राज्यात कोरोना संसर्गाचे थैमान सुरूच असून सोमवारी दिवसभरात 29,744 नव्या कोरोनाबाधितांची भर पडली आहे. त्यामुळे राज्यातील सक्रिय रुग्णसंख्या 2,81,042 वर पोहोचली आहे. तर मागील चोवीस तासांमध्ये 201 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रुग्णांच्या मृत्यूचे वाढते प्रमाण आरोग्य खात्याच्या चिंतेची बाब बनली आहे. दरम्यान, दिवसभरात राज्यात 10,663 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहे. आरोग्य खात्याने प्रसिद्ध केलेल्या हेल्थ बुलेटिननुसार राज्यात आतापर्यंत एकूण 13,68,945 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी एकूण 10,73,257 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत 14,627 जणांचा कोरोनाने बळी गेला आहे. राज्यात सध्या 2.81 लाखाहून अधिक रुग्ण हॉस्पिटल, होम केअरमध्ये उपचार घेत आहेत. सोमवारी दिवसभरात 1,66,407 कोविड चाचण्या करण्यात आल्या. चाचण्यांच्या तुलनेत कोरोना पॉझिटिव्ह अहवाल येण्याचे प्रमाण सोमवारी 17.87 टक्के इतके होते.









