सातारा / प्रतिनिधी :
वाढे फाटा येथे महामार्गावर रविवारी (दि.25) रात्री दीड वाजण्याच्या सुमारास ट्रक चालकाला लुटणाऱ्या टोळीला सातारा शहर पोलिसांनी काही तासातच जेरबंद केले.
सुरज राजू माने (वय 22 वर्षे रा. लक्ष्मी टेकडी सदरबाजार सातारा.), तेजस संतोष शिवपालक (वय 21 वर्षे रा. लक्ष्मी टेकडी सदरबाजार सातारा आणि एका अल्पवयीन मुलाने ट्रकमध्ये घुसून चालक, क्लिनर यांना दमदाटी करुन त्यांच्याकडे पैशांची मागणी केली. त्यांनी प्रतिकार केला असता ट्रक चालकाच्या डोक्यात दगड मारुन ट्रकमधील 20 हजार रुपयांची रोखड चोरुन नेली. या तिघांना अटक करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी दिले होते.
त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक नानासाहेब कदम व त्यांच्या पथकाने घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीनुसार संशयित तिघांना ताब्यात घेतले. सुरुवातीला त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. नंतर विश्वासात घेऊन सखोल चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. याबाबत अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक नानासाहेब कदम करत आहेत.









