सलग चौथ्या दिवशी 3 लाखांहून अधिक रुग्ण ; 24 तासांत 2,767 रुग्णांचा मृत्यू
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशात कोरोनामुळे प्राण गमावलेल्यांचा आकडा दिवसागणिक वाढताना दिसत आहे. दररोज तीन लाखांहून अधिक नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद होताना दिसत आहे. आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासात 3 लाख 49 हजार 691 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर कोरोनामुळे 2,767 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, गेल्या चार दिवसांत दररोज 3 लाखांहून अधिक रुग्ण सापडल्यामुळे देशात 13 लाखांहून अधिक नव्या रुग्णांची नोंद झाली होती.
देशातील वाढत्या कोरोनाच्या रुग्णसंख्येने आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडले असून शनिवारी एकाच दिवसात देशात 3 लाख 49 हजार 691 रुग्णांची भर पडली आहे. देशातील वाढती रुग्णसंख्या ही चिंताजनक असून त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण पडत आहे. गेल्या 24 तासात 2,767 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. बाधितांचा आकडा दररोज वाढत असल्याने देशातील सक्रिय रुग्णसंख्येतही वाढ झाली आहे. देशात सध्या 26 लाख 82 हजार 751 इतके सक्रिय रुग्ण असून गेल्या 24 तासात 2 लाख 17 हजार 113 रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकंदर 1 कोटी 40 लाख 85 हजार 110 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून 1 लाख 92 हजार 311 जणांना कोरोनामुळे प्राण गमवावे लागले आहेत.
गेल्या चार दिवसात 13.41 नवे बाधित
देशात शुक्रवारी 3,46,786 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली होती. त्यानंतर शनिवारी हा आकडा 3,49,691 पर्यंत पोहोचला आहे. त्यत्पूर्वी 21 एप्रिलपासून 24 एप्रिलपर्यंत क्रमशः 3.14 लाख, 3.32 लाख, 3.46 लाख, 3.49 लाख रुग्णांची नोंद झाली आहे. हा आकडा जगभरातील इतर देशांच्या तुलनेत सर्वाधिक आहे.
वॉशिंग्टन विद्यापीठाचा चिंतादायक निष्कर्ष
भारतातील वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर वॉशिंग्टन विद्यापीठाच्या अभ्यासात चिंता वाढवणारा निष्कर्ष समोर आला आहे. त्या निष्कर्षानुसार भारतात येत्या काही दिवसात पाच हजार जणांचा कोरोनाने मृत्यू होण्याची शक्मयता वर्तवण्यात आली आहे. सध्या भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव आणि मृतांची संख्या वाढत आहे. एप्रिल ते जुलै या काळात भारतातील तीन लाख लोकांचा कोरोनामुळे मृत्यू होणार असल्याचा अंदाज या अभ्यासात व्यक्त करण्यात आला आहे. सध्या भारतात कोरोनाची दुसरी लाट सुरू असून दररोज जवळपास साडेतीन लाख रुग्णांची भर पडत आहे. या आकडेवारीचा दाखला देत नजिकच्या काळात मृतांचा आकडा दोन ते तीन हजारांच्या दरम्यान आहे, तो पुढच्या महिन्यापासून पाच हजारांच्या वर जाण्याची शक्मयता आहे. एप्रिल ते जुलै या अडीच महिन्यांच्या काळात जवळपास तीन लाख लोकांचा मृत्यू होण्याची शक्मयता आहे, असेही या अभ्यासात सांगण्यात आले आहे.









