अचूक बातमी “तरुण भारत” ची, शुक्रवार 23 एप्रिल सकाळी 11.30
●तिघांत एक जण आहे पॉझिटिव्ह ● जिल्ह्यात 1,742 रुग्ण बाधित ● कालच्या तुलनेत किंचित दिलासा ● अफवांना प्रशासन वैतागले ● अफवाखोरांवर कडक कारवाचा इशारा
सातारा / प्रतिनिधी :
शुक्रवारी सकाळी आलेल्या आलेल्या अहवालात 1 हजार 742 इतके रुग्ण बाधित आले आहेत. कालच्या उच्चांकी 1 हजार 815 या आकडय़ाच्या तुलनेत शुक्रवारी किंचित कमी वाढ झाली. मात्र पॉझिटिव्हिटी रेट 35 टक्के इतका झाला आहे. त्यामुळे आकडा कमी असला तरी बाधितांचे प्रमाण कायम असल्याचे दिसत आहे. एका बाजूला कोरोना विरूद्धची लढाई युद्धपातळीवर सुरू असताना अफवा पसरवणाऱ्या लोकांचे उद्योग सुरूच असून त्याचा त्रास प्रशासनाला होत आहे. अफवाखोरांवर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे. गुरूवारी रात्रीचा अहवाल शुक्रवारी सकाळी आला. त्यात 1,742 इतके पॉझिटिव्ह आले असून 35.06 इतका पॉझिटिव्हीटी रेट आहे. त्यामुळे बाधितांचे प्रमाण कायम आहे. कडक लॉकडाऊन रात्रीपासून सुरू झाला असून शुक्रवारीही सकाळी अकरानंतर व्यवहार बंद झाले.
जिल्हाबंदीची तयारी सुरू
जिल्हय़ाच्या सीमांवर पोलीस दलाकडून जिल्हाबंदीची तयारी सुरू झाली आहे. सार्वजनिक वाहतूक, खासगी वाहतूक याबाबत निर्बंध असून याबाबत पोलीस दलाची तयारी सुरू झाली आहे. परजिल्हय़ातून येणाऱ्या प्रवाशांवर पोलिसांची नजर असणार असून जिल्हय़ात आल्यानंतर त्यांच्या हातावर क्वारंटाईनचे शिक्केही मारण्यात येणार आहेत.
मेडीकल ऑक्सिजनबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी केले आश्वस्त
जिल्हय़ात दोन तास पुरेल एवढा ऑक्सिजन शिल्लक असल्याचे मेसेज दोन दिवसांपूर्वी व्हायरल झाले होते. याबाबत जिल्हाधिकाऱयांनी जिल्हावासियांना आश्वस्त केले असून मेडीकल सप्लाय चेनवर देशभरात थोडा ताण आहे. मात्र जिल्हा प्रशासन व वैद्यकीय यंत्रणा याबाबत पाठपुरावा करत आहे. जिल्हय़ात अशी परिस्थिती नसून हॉस्पिटल्सनाही विविध सूचना केल्या आहेत. ऑक्सिजनबाबत चुकीचे मेसेज फिरवून परिस्थिती पॅनिक करू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.
फेक मेसेज पसरवणारांवर कडक कारवाईचा इशारा
जीवनावश्यक वस्तू बंद, वृत्तपत्रे बंद अशा आशयाचे मेसेज जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाखाली पसरवण्यात येत आहेत. अशी कोणतीही माहिती वा संदेश पुणे विभागातील जिह्याकडून काढण्यात आला नाही. हा संदेश खोटा असून अशा बनावट मेसेजमधील आवाहनाला कोणीही बळी पडू नये, असे आवाहन प्रभारी उपसंचालक युवराज पाटील यांनी केले आहे. अशा आपत्तीच्या काळात लोकांची दिशाभूल होईल असा कोणताही मजकूर जिल्हा माहिती कार्यालयाचे नाव टाकून खोडसाळपणे पसरविणाऱ्यां संबंधितावर इथून पुढे कारवाई करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले आहे.









