वनखात्याने आखलेली मोहीम यशस्वी होण्यासाठी लोकसहभाग, लोकसहकार्य व वन्य प्राण्याविषयी संवेदना वाढीस लागणे गरजेचे आहे.
वर्षभरापूर्वी कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे बहुतेक सार्वजनिक व्यवहार ठप्प झाले होते. सरकारी कार्यालये नावापुरतीच खुली होती. अशा या बंदिस्त काळात वनखात्याचे एक पथक मोले महावीर अभयारण्यात एका महत्त्वपूर्ण प्रकल्पाच्या कामात गुंतले होते. लोकवस्तीमध्ये येणाऱया वन्यप्राण्यांना रानातच कसे थोपवून धरता येईल, अशी ही योजना होती. रानटी प्राणी व मानवी संघर्ष कमी करण्यासाठी उचललेले हे निर्णायक पाऊल होते. वर्षभराच्या निरीक्षणानंतर जनावरे लोकवस्तीकडे फिरकण्याच्या घटना कमी झाल्याचे आढळून आले.
‘गव्यारेडय़ांच्या संवर्धनासाठी वनखात्यासमोरील आव्हाने’ या विषयावर गेल्याच आठवडय़ात बोंडला प्राणी संग्रहालयात प्रसार माध्यमांसाठी सत्र झाले. गवेरेडे व इतर वन्यप्राण्यांची लोकवस्तीकडे फिरकण्यामागील मुख्य कारणे हा चर्चासत्राचा विषय होता. त्यात वनखात्याच्या अधिकारांनी वरील प्रकल्पासंबंधी सविस्तर माहिती दिली. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकारणाने देशभरात वन्यजीव जागृती सप्ताह आयोजित केला आहे. 75 प्राणी, 75 सप्ताह व 75 प्राणीसंग्रहालय अशी ही अभिनव संकल्पना असून चौथा राष्ट्रीय सप्ताह गोव्यातील बोंडला प्राणीसंग्रहालयात झाला. गोव्याच्या वनखात्याने ‘राज्यप्राणी गवारेडा व त्याचे संवर्धन’ हाच विषय केंद्रस्थानी ठेवला होता. विद्यार्थ्यांनी रेखाटलेले राज्यप्राणी गवारेडा हे बोधचिन्ह राष्ट्रीय स्तरावर पोहोचले आहे. विशेष म्हणजे वन खात्याच्या प्रंट लाईन कर्मचाऱयांसाठी आखलेल्या मार्गदर्शन सत्रात गव्यासंबंधी तक्रारीचा पाठपुरावा, शेतकऱयांच्या नुकसानीचे डॉक्युमेंटेशन, लोकवस्तीमध्ये फिरकणाऱया जनावरांचे सातत्याने मॉनिटरिंग, एखाद्या प्राण्याचे आपला अधिवास सोडून नवीन जागेत येण्यामागील कारणे व बचाव मोहिमेसंबंधी शास्त्रीय व तांत्रिक मार्गदर्शनही झाले. मुळात आपला अधिवास सोडून या प्राण्यांना लोकवस्तीपर्यंत का यावे लागले यावर चर्चाच नव्हे तर कृती योजनाही सुरू झाल्या. गवारेडा हा गोव्याचा राज्यप्राणी. सांगे, धारबांदोडा, सत्तरी, पेडणे, काणकोण तालुक्यांमध्ये त्याचा वावर आहे. धिप्पाड असणारा हा प्राणी हिंस्र नसला तरी शेतकऱयांसाठी उपद्रवी मात्र निश्चितच आहे. कुठल्याही शेती बागायतीमध्ये घुसून पिके फस्त करतानाच ती उद्ध्वस्त करण्यासाठी तो कुप्रसिद्ध मानला जातो. बलदंड देहाप्रमाणेच त्याची भूकही तेवढीच मोठी असल्याने एकावेळी साधारण सत्तर ते ऐंशी किलो खाद्य तो सहज फस्त करतो. त्यामुळे एका बागायतीमध्ये घुसल्यानंतर तेथील केळी, अननस व इतर पिकांची नासधूस करणाऱया या प्राण्यामुळे शेतकरी व या प्राण्यामध्ये संघर्ष निर्माण झाला. रानावनात वावरणारे गवेरेडे शेती-बागायतीकडे वळण्यामागील मुख्य कारण म्हणजे गावाजवळील बागायतीमध्ये त्यांना आकर्षित करणारे खाद्य. एका विशिष्ट परिस्थितीमुळे ही जनावरे शेती बागायतीकडे वळू लागली आहेत. सांगे व धारबांदोडा तालुक्यातील खाण उद्योग, चिरेखाणी, खडी क्रशर व इतर कारणांमध्ये या प्राण्यांचा अधिवास व संचार क्षेत्रात झालेला हस्तक्षेप हे त्यामागील एक कारण आहे. आटत चाललेले पाणथळ तसेच उन्हाळय़ात रानावनातील वाळलेले गवत खाण्यापेक्षा बागायतीमधील केळी, अननस, काजूची बोंडे अशा खाद्यावर तो तुटून पडत आहे. बागायतीमध्ये शिरलेल्या गव्यारेडय़ांना हाकलून लावण्याच्या प्रयत्नात गव्यारेडय़ाशी माणसाचा जवळून संपर्क आल्याने शेतकऱयांवर हल्ले झाले आहेत.हा संघर्ष कमी करण्यासाठी ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग स्ट्रक्चर’ या प्रकल्पाअंतर्गत महावीर अभयारण्यात चार ठिकाणी पाणथळ तयार करण्यात आले असून उन्हाळय़ात वन्यप्राण्यांची तहान भागवितानाच, त्यांचे पाण्यासाठी होणारे स्थलांतर रोखणे हा त्यामागील उद्देश आहे. याशिवाय तृणहारी वन्यप्राण्यांना त्यांचे खाद्यान्न त्यांच्या अधिवास व संचार क्षेत्रातच उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. रानात हिरव्या चाऱयाची लागवड हा या योजनेचा एक भाग असून प्राण्यांसाठी उपयुक्त ठरतील अशा आंबा, फणस व इतर स्थानिक फळझांडाची लागवड करण्यावर भर दिला जात आहे. जलसंवर्धन प्रकल्प हा बहुउद्देशीय असून मोठय़ा प्रमाणात वाया जाणाऱया पावसाच्या पाण्याचे वर्षभरासाठी भूगर्भात संचय करणे हाही त्यामागील हेतू आहे. केंद्र सरकारच्या जलसंवर्धन योजनेखाली हा प्रकल्प राबविण्यात आला आहे. महावीर अभयारण्यात एकूण 18 नैसर्गिक पाणथळ व चार काँक्रिटने बांधलेले जलकुंड तयार करण्यात आले आहेत. प्रकल्पांसाठी निवडण्यात आलेली जागा रानातील नैसर्गिक नाल्यांना जोडूनच निवडली गेल्याने या नाल्यांवर छोटे बंधारे बांधून पावसाचे पाणी जमिनीत झिरपण्याची सोय करण्यात आली आहे, जूनचा पाऊस सुरू होईपर्यंत वन्य प्राणी व पक्ष्यांची पाण्याच्या शोधात भ्रमंती सुरू होते. जवळपास पाणी न मिळाल्यास ते आपला अधिवास सोडून पाण्यासाठी लोकवस्तीजवळ किंवा दुसऱया भागात जाण्याची शक्यता असते. पाण्यासाठी त्यांचे होणारे हे स्थलांतर थांबावे व त्यांना आपल्या अधिवास क्षेत्रातच पाणी मिळावे यासाठी वनखात्याची ही योजना उपयुक्त ठरणार आहे. जलसंचयासाठी बांधलेले जलाशय प्राणी व पक्ष्यांसाठी नैसर्गिकरित्या आकर्षित करणारे असून वन्यजीवांची अन्नसाखळी टिकून राहण्यासही मदत होणार आहे. एका निरीक्षणामध्ये पर्यावरणीय साखळीतील महत्त्वाचा घटक असलेल्या बेडकांसाठीही हे पाणथळ उपयुक्त ठरू लागले आहेत. अशा जागांवर बेडकांची अंडी व प्रजनन वाढू लागल्याचेही स्पष्ट झाले आहे. वनखात्याने टाकलेले हे पाऊल स्तुत्य आहे. वन्यप्राण्यांचे बदलते स्वभाव, संघर्षामागील कारणे केवळ माणूसच समजू शकतो. वनखात्याने आखलेली ही मोहीम खऱया अर्थाने यशस्वी होण्यासाठी लोकसहभाग, लोकसहकार्य व वन्य प्राण्याविषयी संवेदना वाढीस लागणे तेवढेच गरजेचे आहे.
सदानंद सतरकर








