चिपळूण-मिरजोळीतील माळी कुटुंबाची हदय़ पिळवटून टाकणारी कहाणी
राजेश जाधव/ चिपळूण
एखादया कुटुंबावर किती संकटे यावीत यालाही काही मर्यादा आहेत. मिरजोळी-साखरवाडी येथील माळी कुटुंब त्यातीलच एक आहे. या कुटुंबातील उमदय़ा तरूणाचा 12 वर्षापूर्वी धावत्या बसमधून पडून मृत्यू झाला. त्याच्या आठवणी उराशी बाळगून कुटुंब गुजराण करीत असतानाच कोरोनामुळे याच कुटुंबातील बाप-लेकाचा दोन दिवसांच्या फरकाने नुकताच मृत्यू झाला आहे. त्यामुळे या कुटुंबात आता दोन महिला व दोन चिमुकल्यांना सर्वाच्या आठवणी जागवत जीवन कंठावे लागणार आहे. या घटनेमुळे गाव शोकसागरात बुडाले आहे.
दीपक देवाजी माळी (55), अजित दीपक माळी (32) अशी या दुदैवी बाप-लेकाची नावे आहेत. दीपक माळी यांचे चिपळूण शहरातील उक्ताड हे मूळगाव, त्यांनी 20 वर्षांपूर्वी लगतच्या मिरजोळी-साखरवाडी येथे जागा खरेदी करून घर बांधले. येथे ते पत्नी, दोन मुलगे, मुलगी यांच्यासह राहत होते. त्यांचा संसार अगदी सुखाने चालला होता. मात्र याच सुखी संसाराला नियतीची नजर लागली आणि 12 वर्षांपूर्वी त्यांच्या कमावत्या अमित माळी (21 त्यावेळचे वय) याचा बस अपघातात मृत्यू झाला. तो एका शाळेच्या बसवर क्लिनर होता. मुलाना बस सोडायला जात असताना त्याचा तोल जाऊन खाली पडल्याने त्याचा मृत्यू झाला होता.
तरूण, उमदा मुलगा, भाऊ गेल्याचे दुख पचणारे नव्हते. तरीही त्यातून सावरत माळी यांनी संसाराला उभारी देण्याचा प्रयत्न केला. यातून मुलीला शिक्षिका तर दुसऱया मुलाला उच्चशिक्षित केले. मुलीला नोकरी लागल्यावर तिचा विवाह केला. घराला घरपण देता यावे यासाठी अजित याचाही काही वर्षापूर्वी विवाह केला. दोन वर्षांपूर्वी अजितला एसटी महामंडळात चालक म्हणून नोकरी लागली. त्यामुळे पुन्हा संसाराचा गाडा रूळावर येत होता. मुलगा नोकरी तर ते स्वतः घरातच दुकान सांभाळत होते. आपण आता आनंदी आहोत. नातवंडे इंग्लिश शाळेत शिकतात. आता सारे ठीक चालले आहे असे ते सर्वच ग्रामस्थांना सांगत असत.
असे असताना त्यांच्या संसाराला पुन्हा एकदा नजर लागली. काही दिवसापूर्वी अजित मुंबईला बस घेऊन गेला होता. ही सेवा करून आल्यावर त्याला ताप आला. कोरोना चाचणी केली असता पॉझिटिव्ह आली. त्यामुळे तो शासकीय रूग्णालयात दाखल झाला. मात्र प्रकृती बिघडल्याने त्याला एका खासगी रूग्णालयात आणण्यात आले. यामुळे माळी कुटुंबाची चिंता वाढली असतानाच काही दिवसापूर्वी दीपक माळी व त्यांच्या सुनेचा अहवालही पॉझिटिव्ह आला. मात्र हे दोघे घरातच उपचार घेत होते. चार दिवसांपूर्वी दीपक माळी यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना शासकीय रूग्णालयात नेण्यात आले. मात्र तेथे त्यांचा मृत्यू झाला. हा प्रकार अजितला कळू द्यायचा नाही, असे नातेवाइकांनी ठरवले होते. मात्र दोन दिवसापूर्वी व्हॉटस्पच्या माध्यमातून त्याला समजले आणि त्याने खाणेपिणेच सोडले. अखेर त्याचाही मंगळवारी मृत्यू झाला. त्यामुळे माळी कुटुंबातील कर्तेच नियतीने हिरावले असून आता कुटुंबाचा गाडा हाकण्याची वेळ सासू-सुनेवर आली आहे.
आमचे पपा-बाबा कुठे आहेत
अजित याला 6 वर्षांची नारायणी तर 5 वर्षांचा चिन्मय अशी दोन मुले आहेत. या मुलांना आईवडीलांसह आजी-आजोबांचा अधिक लळा आहे. अजित व दीपक माळी यांना रूग्णालयात भरती केल्यापासून या दोघांना त्यांच्या आजोळी सुरक्षित ठेवण्यात आले आहे. मात्र हे दोघेही आमचे पपा-बाबा कुठे आहेत असे सातत्याने विचारत आहेत. त्यांचा हा निरागस प्रश्न अनेकांचे अ़श्रू अनावर करीत असून त्यांना काय सांगायचे असा प्रश्न आता नातेवाईकांना पडला आहे. या दुर्दैवी घटनेने मिरजोळी गावासह परिसर शोकसागरात बुडाला आहे.









