4 दिवस पार पडले विविध कार्यक्रम : संभाजी भिडे गुरुजी- इंदुरीकर महाराजांची उपस्थिती : कोरोनामुळे कार्यक्रम नियमानुसारच

वार्ताहर / किणये
सांवगाव येथे श्री शिवस्मारक सेवा समिती व ग्रामस्थांच्या सहकार्यातून गावातील लक्ष्मी चौक येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनारुढ मूर्तीची प्रतिष्ठापना पाडव्याच्या शुभमुहूर्तावर करण्यात आली. गावात छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती उभारली असल्यामुळे सर्वत्र उत्साहाचे वातावरण पसरले असून या सोहळय़ासाठी ग्रामस्थ एकवटले होते.
शिवप्रति÷ान हिंदुस्थानचे संस्थापक प्रा. संभाजी भिडे गुरुजी व महाराष्ट्रातील लोकप्रिय कीर्तनकार हभप निवृत्तीनाथ महाराज इंदुरीकर यांची विशेष उपस्थिती या सोहळय़ाला लाभली होती. पाच दिवस गावात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. कोरोनामुळे सर्व कार्यक्रम प्रशासनाच्या नियमानुसारच झाले. कार्यक्रमांमध्ये सामाजिक अंतर तसेच येणाऱया प्रत्येक भाविकाचे थर्मल
स्क्रॅनिंग व सॅनिटायझर करण्यात येत होते.
शिवाजी महाराजांची सिंहासनारुढ 11 फूट उंचीची पंचधातूमध्ये मूर्ती साकारण्यात आली आहे. लक्ष्मी गल्लीच्या चौकात भव्य असे शिवस्मारक बनविण्यात आले असून त्या ठिकाणी शिवरायांची मूर्ती उभारण्यात आली आहे. या शिवस्मारकाचे उद्घाटन गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर करण्यात आले असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजू घाटेगस्ती होते. शिवस्मारकाचे उद्घाटन निळकंठराव व्यंकटेश देशपांडे यांच्या हस्ते करण्यात आले. तर शिवमूर्तीचे पहिले पूजन प्रकाश बळवंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. शिवमूर्तीचा अभिषेक गावातील पंचकमिटी, आजी-माजी ग्राम पंचायत सदस्य व सदस्या यांच्या हस्ते करण्यात आले.
राणू महाराजांचे टाळमृदंगाच्या गजरात स्वागत
गुरुवार दि. 15 रोजी दुपारी 12 वाजता पंढरपूर येथील वास्कर संप्रदायाचे राणू महाराज वास्कर यांनी उपस्थिती दर्शविली होती.
राणू महाराजांचे गावात टाळमृदंगाच्या गजरात दिंडीने स्वागत करण्यात आले.
त्यानंतर राणू महाराजांच्या हस्ते शिवमूर्तीचे पूजन करण्यात आले. त्यानंतर त्यांचा प्रवचनाचा कार्यक्रम झाला. राष्ट्रसेवा करत असताना परमार्थ कसा साधावा? आणि आपल्या गावाचा सर्वांगीण विकास कसा करावा? याबाबत राणू महाराज यांनी आपल्या प्रवचनातून मार्गदर्शन केले.
शिवशाहीर शुभांगी दिवटेचा पोवाड कार्यक्रम
रात्री 8 वाजता बेळगावची शिवशाहीर शुभांगी दिवटे हिचा पोवाडय़ाचा कार्यक्रम झाला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनकथेवर आधारित विविध पोवाडे सादर करून उपस्थितांची वाहवा शुभांगीने मिळविली. त्यानंतर गावातील मुला-मुलींचा शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम झाला.
संसार करताना परमार्थ कसा साधावा-इंदुरीकर

रविवार दि. 18 रोजी रात्री 8 वाजता महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध राष्ट्रीय कीर्तनकार हभप निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचे कीर्तन झाले. संसार करीत असताना परमार्थ कसा साधावा, तसेच सध्याची तरुणाई कोणत्या दिशेने चालली आहे, देशाच्या हितासाठी तरुणाईने कोणती पावले उचलली पाहिजेत, याबाबत आपल्या विनोदी शैलीतून इंदुरीकर महाराज यांनी सर्वांनाच खिळवून ठेवले होते. स्वराज्याच्या रक्षणासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी जसे कार्य केले. त्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांचे आचार-विचार आपल्या जीवनात आचरणात आणावे, आपल्या आई-वडिलांची सेवा करावी, असेही त्यांनी आपल्या किर्तनातून सांगितले.
सोमवारी सकाळी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक प्रा. संभाजी भिडे गुरुजी यांनी सांवगाव गावात विशेष उपस्थिती दर्शविली होती. भिडे गुरुजी यांचे गावात जल्लोषात स्वागत करण्यात आले. प्रारंभी भिडे गुरुजींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विधिवत पूजा केली. त्यानंतर अभिषेक व मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘जय भवानी, जय शिवाजी’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमून सोडला.
देव, देश आणि धर्मावर भिडे गुरुंजीचे मार्गदर्शन

भिडे गुरुजी यांनी देव, देश आणि धर्मासाठी तरुणांनी कोणती कार्ये केली पाहिजेत, याबाबत आपले विचार मांडले. यावेळी गावातील नागरिक, महिला, वारकरी, धारकरी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवस्मारक सेवा समितीचे सर्व पदाधिकारी, पंचमंडळी, ग्राम पंचायत सदस्य, सदस्या, गावातील सर्व युवक मंडळे, विविध संघ-संस्था आदींचे मोलाचे सहकार्य लाभले.
आदर्शवत शिवस्मारक सेवा समिती
सांवगावात छत्रपती शिवाजी महाराजांचे शिवस्मारक उभारून त्या ठिकाणी सिंहासनारुढ छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती उभारण्याचा संकल्प शिवस्मारक समितीने केला आणि तो तडीस नेला. या कार्यासाठी गावात कोणत्याही पद्धतीचे राजकारण आणू दिले नाही. राजकारण बाजूला ठेवत गावातील सर्व नागरिकांना एकत्र घेऊन शिवस्मारक सेवा समितीने कार्य केले. या संघटनेतील कृतीशील कार्यप्रणालीचे व कार्यकर्त्यांचे परिसरात कौतुक होत आहे.









