मुंबईसमोर मध्यफळीतील त्रुटी दुरुस्त करण्याचे आव्हान
चेन्नई / वृत्तसंस्था
विद्यमान विजेते मुंबई इंडियन्स व दिल्ली कॅपिटल्स हे हेवीवेट संघ आज (मंगळवार दि. 20) आयपीएल साखळी सामन्यात आमनेसामने भिडणार असून यानिमित्ताने आणखी एका रॉयल, रंगतदार लढतीची क्रिकेट जगताला प्रतीक्षा आहे. सायंकाळी 7.30 वाजता या सामन्याला सुरुवात होईल.
मुंबई इंडियन्सला सलग तिसरा विजय संपादन करायचा असेल तर त्यांना सर्वप्रथम मध्यफळीतील त्रुटींची दुरुस्ती करावी लागेल. दुसरीकडे, दिल्लीचा संघ वानखेडे स्टेडियमवर पंजाब किंग्सला 6 गडी राखून धूळ चारण्यात यशस्वी झाला असल्याने त्यांचे मनोबल उंचावलेले असणार आहे.
मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने बऱयाचदा आश्वासक सुरुवात केली आहे. पण, त्याच्याकडून याचे मोठय़ा खेळीत रुपांतर होणे अपेक्षित आहे. अगदी क्विन्टॉन डी कॉकबद्दल देखील हेच लागू होते. मुंबई इंडियन्स संघात सुर्यकुमार यादव, इशान किशन, केरॉन पोलार्ड, हार्दिक पंडय़ा, कृणाल पंडय़ा अव्वल खेळ साकारु शकतात. मात्र, हे सर्व अद्याप एकाच वेळी ‘क्लिक’ होणे बाकी आहे. मागील सामन्यानंतर दस्तुरखुद्द रोहित शर्मानेच आपला संघ मध्यफळीत आणखी सरस फलंदाजी करु शकतो, असे म्हटले आहे.
जसप्रित-स्टोक्सची भेदक गोलंदाजी
जसप्रित बुमराहच्या नेतृत्वाखाली मुंबईची गोलंदाजी मागील दोन सामन्यात कमालीची यशस्वी झाली आहे. दोन्ही सामन्यात त्यांनी 150 व 152 अशा कमी धावसंख्येचे संरक्षण केले होते. स्ट्राईक बॉलर्स बुमराह (3 बळी), ट्रेंट बोल्ट (3 बळी) यांनी विशेषतः निर्णायक षटकात भेदक मारा साकारला आहे. लेगस्पिनर राहुल चहर मागील 2 सामन्यात 7 बळी घेण्यात यशस्वी ठरला आहे. मुंबईने मागील लढतीत ऍडम मिल्नेला खेळवले होते. मात्र, येथे खेळपट्टीचे स्वरुप पाहता, ते ऑफस्पिनर जयंत यादवला खेळवू शकतात.
दिल्लीसाठी रहाणेचा पर्याय विचाराधीन
दुसरीकडे, दिल्ली संघाने रविवारच्या लढतीत स्टीव्ह स्मिथला खेळवले होते. मात्र, येथील संथ खेळपट्टीवर ते अनुभवी अजिंक्य रहाणेचा विचार करु शकतात. रहाणे अशा खेळपट्टय़ांवर स्मिथपेक्षा अधिक सरस योगदान देण्याची क्षमता राखून आहे. कर्णधार रिषभ पंत जागतिक स्तरावरील कोणत्याही गोलंदाजीच्या चिंधडय़ा करु शकतो. या सामन्याच्या निमित्ताने मागील स्पर्धेतील दोन फायनलिस्ट आमनेसामने भिडणार असल्याने ही लढत रंगतदार ठरु शकते.
दिल्लीकडे मार्कस स्टोईनिस व ललित यादव असे दोन अष्टपैलू असून गोलंदाजीची धुरा कॅगिसो रबाडा, ख्रिस वोक्स यांच्याकडे आहे. शिवाय, ऍनरिच नोर्त्झेचा पर्यायही त्यांच्याकडे उपलब्ध आहे. दिल्लीने यापूर्वी पंजाबविरुद्ध 4 जलद गोलंदाज खेळवले. मात्र, चेन्नईतील या लढतीत ते अधिक फिरकीपटू खेळवू शकतील. अमित मिश्रा, प्रवीण दुबे, रविचंद्रन अश्विन, शॅम्स मुलाणी असे पर्याय त्यांच्याकडे आहेत.
प्रतिस्पर्धी संघ
दिल्ली कॅपिटल्स ः शिखर धवन, पृथ्वी शॉ, अजिंक्य रहाणे, रिषभ पंत, शिमरॉन हेतमेयर, मार्कस स्टोईनिस, ख्रिस वोक्स, रविचंद्रन अश्विन, शॅम्स मुलाणी, अमित मिश्रा, ललित यादव, प्रवीण दुबे, कॅगिसो रबाडा, ऍनरिच नोर्त्झे, इशांत शर्मा, अवेश खान, स्टीव्ह स्मिथ, उमेश यादव, रिपल पटेल, विष्णू विनोद, लुकमन मेरिवाला, एम. सिद्धार्थ, टॉम करण, अनिरुद्ध जोशी.
मुंबई इंडियन्स ः रोहित शर्मा, ऍडम मिल्ने, आदित्य तरे, अनमोलप्रीत सिंग, अनुकूल रॉय, अर्जुन तेंडुलकर, ख्रिस लिन, धवल कुलकर्णी, हार्दिक पंडय़ा, इशान किशन, जेम्स नीशम, जसप्रित बुमराह, जयंत यादव, केरॉन पोलार्ड, कृणाल पंडय़ा, मार्को जान्सन, मोहसीन खान, नॅथन काऊल्टर-नाईल, पियुष चावला, क्विन्टॉन डी कॉक (यष्टीरक्षक), राहुल चहर, सौरभ तिवारी, सुर्यकुमार यादव, ट्रेंट बोल्ट, युद्धवीर सिंग.
सामन्याची वेळ ः सायं. 7.30 वा.









