मुंबई
बजाजच्या बहुचर्चित इलेक्ट्रीक चेतक स्कुटरने पुन्हा एकदा बुकिंगमध्ये बाजी मारल्याचे समजते. मोठय़ा मागणीनंतर 48 तासाच्या आतच कंपनीला बुकिंग थांबवावे लागले असल्याचे समजते.चेतक इलेक्ट्रीक या लोकप्रिय दुचाकी स्कुटरच्या बुकिंगला सुरूवात झाल्यानंतर याला ग्राहकांचा मोठा प्रतिसाद लाभला असल्याचे दिसून आले. अलीकडेच कंपनीने चेतक इलेक्ट्रीक स्कुटरच्या बुकिंगला सुरूवात केली होती. अनेकांनी खरेदीकरीता बुकिंग नोंदणी मोठय़ा प्रमाणात केली. भरघोस प्रतिसाद मिळताच कंपनीने लागलीच बुकिंग थांबवले. पुण्यातील कंपनीने वाहन वितरणाच्या व्यवस्थेचा आढावा घेऊन पुढील बुकिंगची तारीख लवकरच जाहीर केली जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
बुकिंग बंद करण्याआधीच कंपनीने आपल्या चेतक स्कुटरची किंमत वाढवण्याची घोषणा केली आहे. कंपनी सध्या या दुचाकी देशभरातील ठराविक शहरात विक्रीकरीता उपलब्ध करते आहे.
किंमत वाढवली
आधीच्या किंमतीच्या तुलनेत 27 हजार रुपये अधिक किंमत चेतकची वाढली असल्याचे समजते. वाढलेल्या किंमतीसह आता स्कुटरची किमत 1 लाख 42 हजार 620 रुपये (पुणे) होणार आहे. याआधी मार्च 2021 मध्ये गाडीची किंमत 5 हजाराने वाढली होती. मागच्या वर्षी सदरची दुचाकी कंपनीने सादर केली होती. कंपनीचे देशात एकूण 19 विक्रेते आहेत. पुण्यात 5 आणि बेंगळूरात 13 विक्रेते असल्याचे कंपनीने सांगितले.









