धार्मिक आणि इतर भावना असण्याचा मनुष्यमात्राला हक्क आहेच. पण तो बजावण्यासाठी शिर सलामत ठेवायचे असेल तर त्या शिरकमलाच्या आतल्या मेंदूचा देखील वेळोवेळी सल्ला घ्यायला हवाच. कोरोना नावाच्या रोगाने जवळजवळ दीड वर्षाहून जास्त काळ जगभर धुमाकूळ घातला आहे. शहाणीसुरती माणसे लोकांना सांगत आहेत की गर्दी टाळा, अनावश्यक संपर्क आणि स्पर्श टाळा, सार्वजनिक ठिकाणी हिंडताना नाकावर चांगला मास्क लावा, घरी गेल्यावर हातपाय स्वच्छ धुवा, वगैरे.
अशा वेळी काही माणसे समाज माध्यमांवर ‘कोरोना नावाचा रोगच अस्तित्वात नाही, आपल्याला फसवण्यासाठी रचलेले हे षड्यंत्र आहे’ वगैरे गोष्टी सांगतात. काही माणसे या रोगावर अक्सीर इलाज म्हणून काढय़ासारखी तथाकथित आयुर्वेदिक औषधे, मंतरलेले ताईत, भाभीजीका पापड वगैरे विकून गब्बर होता-होता स्वतःच कोरोनाची बाधा होऊन मेलेली आढळली. कोरोना काल्पनिक आहे असे छातीठोकपणे सांगणारेदेखील कोरोना होऊनच निवर्तलेले आढळले. तरीही लोकांचा समाज माध्यमांवरचा आंधळा विश्वास ओसरला नाहीच.
या काळात सरकार सांगत होते की गर्दी होईल असे धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम टाळा. तर काही नेते लोकांना चिथावणी देत होते की जत्रा, उरूस, तीर्थयात्रा, वाऱया बंद पडू देऊ नका. लोकांनी गर्दीत जाणे टाळले. काही वेळा लोकांना गर्दीचा मोह आवरला नाही. उत्सवप्रियतेला लगाम लावता आला नाही. कोरोनाची दुसरी लाट आली. जगभर आली. तशी आपल्याकडे आली.
पण मरणाच्या भीतीनेदेखील लोकांच्या वागण्याला पुरेशी शिस्त आली नाही. लोक हनुवटीवर मास्क लावून फिरतानाचे फोटो अनेक ठिकाणी बघायला मिळाले. रस्त्यावर पोलीस दिसला की हनुवटीवरचा मास्क चपळाईने नाकावर सरकवणारी माणसे दिसली. मास्क पोलिसांच्या समाधानासाठी लावायचा नसून कोरोनापासून स्वतःच्या रक्षणासाठी लावायचा आहे हे लोक विसरले.
कुंभ मेळा यंदा नसता झाला तर बरे झाले असते. त्यात भाग घेणाऱया कित्येक हिंदूंना कोरोनाची बाधा झाली. एक महंत देवाघरी गेले तेव्हा घाईघाईने तो आवरता घेतला. आता कोरोनामुळे जे प्राण गमावतील त्याला जबाबदार इतर धर्मीय नसतील तर त्यांच्याच भावना असतील. ज्या भावनांनी त्यांच्या बुद्धीवर मात केली.








