शस्त्रसज्ज पोलिसांसह इमारतीतून बाहेर पडला रोबोट डॉग
न्यूयॉर्कच्या मॅनहॅटन येथील एका इमारतीतून पोलीस अधिकाऱयांचा समूह एका व्यक्तीला बाहेर आणताना दिसून आला. त्या व्यक्तीकडे एक बंदूक होती आणि तो एक महिला तसेच्या तिच्या मुलासह अर्पाटमेंटमध्ये लपला होता. ही घटना अमेरिकेतील नागरिकांसाठी सामान्य होती. पण त्यानंतर इमारतीतून जे बाहेर पडले त्यामुळे अमेरिकेत खळबळ उडाली आहे. पोलिसांच्या पथकासह एक डॉग रोबोट स्वतःच्या चार पायांवर बाहेर पडला. तो एखाद्या प्रशिक्षित श्वानाप्रमाणे लोक आणि वाहनांपासून वाचत पुढे जात होता. हे दृश्य एखाद्या सायन्स फिक्शन चित्रपटासारखे होते. सुमारे 33 किलो वजनाच्या या रोबोट डॉगला पाहून लोक अवाप् झाले. तो कॅमेरा, कम्युनिकेशन सिस्टीम आणि आर्टिफिशियल इंटेलिजेन्सने युक्त होता.
55 लाख रुपये किंमत
या रोबोट डॉगची किंमत 74 हजार डॉलर्स म्हणजेच सुमारे 55 लाख रुपये आहे. हा रोबोट डॉग 14 किलोपर्यंत वजनाची उपकरणे स्वतःसोबत नेऊ शकतो. तसेच सुमारे 5.6 किलोमीटर प्रतितासाच्या वेगाने धावू शकतो. इंटय़ूटिव्ह टॅबलेट ऍप्लिकेशन आणि इनबिल्ट स्टीरियो कॅमेऱयांद्वारे याला दूरवरून नियंत्रित करता येते. रोबोट डॉग स्पॉट वाय-फायद्वारे अमर्यादित डाटा स्टोअर करू शकतो. एकापेक्षा अधिक असल्यास हे रोबोट डॉग परस्परांमध्ये संपर्क साधू शकतात.
अत्याधुनिक उपकरणांनी सज्ज
ओबड-धोबड कच्चे रस्ते असो किंवा शिडी किंवा एखादी बहुमजली इमारत हा रोबोट डॉग आर्टिफिशियल इंटेलिजेन्सद्वारे सर्व रस्त्यांना स्कॅन करून निर्णय घेतो. हा रोबोट डॉग निरीक्षणासाठी स्वतःचा मार्ग निवडून लक्ष्यापर्यंत पोहोचू शकतो. याला 360 डिग्री कॅमेरे, थर्मल कॅमेरे, गॅस सेन्सर, रेडिएशन सेन्सरने सज्ज केले जाऊ शकते. त्यांच्या माध्यमातून पाणी, गॅस, थंड-गरम वस्तू किंवा वातावरण तसेच किरणोत्सर्गाचा थांगपत्ता लावला जाऊ शकतो. तसेच याच्याद्वारे दूरवरूनच एखाद्याशी संभाषण साधले जाऊ शकते आणि ही सुविधा अपहरणकर्त्याशी संपर्क साधण्यास उपयुक्त ठरणार आहे.