58 हजार सौरबल्बांनी उजळला डोंगर
सर्वसाधारणपणे लोक फुलांनी बहरलेले क्षेत्र पाहण्यास पोहोचतात, पण तुम्ही रात्री देखील हे दृश्य पाहू शकाल आणि ते ही वेगळय़ा स्वरुपात. अमेरिकेतील कलाकार ब्रूस मुन्रो यांनी कॅलिफोर्नियातील 15 एकरच्या डोंगरावर 58 हजार रंगबिरंगी सौरबल्ब लावले आहेत. हे बल्ब सूर्यास्त होताच उजळून निघतात.
अमेरिकेत कोविड-19 च्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे डिसेंबरमध्ये मुन्रो यांनी या कलाकृतीचे काम बंद केले होते. पण स्थिती सुधारल्याचे पाहून पुन्हा काम सुरू केले आहे. त्यांनी या प्रदर्शनाला ‘अपेक्षांचा प्रकाश’ नाव दिले आहे. महामारीमुळे लोक दिवसा घरातून बाहेर पडू शकत नाहीत. अशा स्थितीत लोक येथे येऊन चांगली अनुभूती घेऊ शकतील असे मुन्रो यांचे मानणे आहे. यंदा मुन्रो यांनी 17 हजार वाइनच्या रिकाम्या बाटल्यांद्वारे 69 टॉवरही तयार केले आहेत. या कलाकृतीमुळे हा डोंगर ‘फील्ड ऑफ लाइट्स’ या नावाने प्रख्यात झाला आहे.