पुसेसावळी / वार्ताहर :
पुसेसावळी ता. खटाव येथे एकाच दिवशी एकाच दुकानावर सातारच्या टीमने दोन वेळा धाड टाकून अवैध गुटखा पोती व एक कार असा तीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करत कारवाई केली. कारवाई होऊन देखील दुसऱ्या दिवशी पुसेसावळीतील या दुकानातून खुलेआम गुटखा विकला जात आहे. याचा अर्थ ज्याप्रकारे या दुकानावर कारवाई झाली पाहिजे, तशी कारवाई होत नाही किंवा अवैध गुटखा विकणारे मुजोर दुकानदार प्रशासनास भीत नाहीत.
संपूर्ण राज्यात गुटखा बंदीचा स्तुत्य निर्णय शासनाने घेतला असला तरी या निर्णयाची कडक अंमलबजावणी होताना दिसत नाही. गुटखा पुरवणाऱ्यावर व विक्री करणाऱ्यावर केवळ जुजबी व कागदोपत्री कारवाई केल्याचे दिसत आहे. त्यामुळे राजरोजसपणे गुटखा विक्री होत आहे. पान टपरी बरोबरच किराणा मालाच्या दुकानातून तंबाखू, सिगारेट व गुटखा यांची खुलेआम विक्री केली जात असल्याचे दिसत आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यात लक्ष घालून पुसेसावळीतील खुलेआम गुटखा विक्री बंद करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.









