मुंबई / ऑनलाईन टीम
कोरोनाच्या उपचारांमधये महत्त्वपूर्ण ठरत असलेल्या रेमडेसिव्हीर इंजेक्शन्सच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात चांगलेच राजकारण तापले आहे. दमणच्या ब्रूक फार्मा या कंपनीकडे तब्बल 60 हजार रेमडेसिव्हीरचा साठा असल्याची माहिती मुंबई पोलिसांना मिळाली होती. काही दिवसांपूर्वी राज्यातील भाजपच्या नेत्यांनी याच कंपनीत जाऊन महाराष्ट्रासाठी काही इंजेक्शन्स बूक केली होती.
मात्र, शनिवारी मुंबई पोलिसांनी अचानक ब्रूक फार्मा कंपनीचे मालक राजेश डोकानिया यांना ताब्यात घेतले. त्यानंतर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांनी तात्काळ बीकेसी येथील पोलीस उपायुक्तांच्या कार्यालयात धाव घेत याविषयी जाब विचारला. त्यावेळी पोलिसांनी आम्ही राजेश डोकानिया यांना केवळ चौकशीसाठी बोलावले होते, असे स्पष्ट केले.
या सगळ्या प्रकारानंतर मुंबई पोलिसांनी राजेश डोकानिया यांना केवळ चौकशीसाठी ताब्यात घेतल्याचे स्पष्ट केले. डोकानिया यांच्याकडे 60 हजार रेमडेसिव्हीर इंजेक्शन्सचा साठा होता. त्यामुळे आम्ही त्यांना चौकशीसाठी बोलावले होते. चौकशीदरम्यान राजेश डोकानिया यांनी सर्व कायदेशीर कागदपत्रे दाखवल्यानंतर आम्ही त्यांना सोडून दिले, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली.
यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी तुम्ही राजेश डोकानिया यांना अशाप्रकारे अटक करू शकत नाही, असे सांगितले. त्यांनी फक्त भाजपच्या नेत्यांना इंजेक्शन्स दिली म्हणून त्यांच्यावर कारवाई होऊ शकत नाही. आमच्याकडे अन्न व औषध प्रशासानाची परवानगी होती. ठाकरे सरकारमधील मंत्र्याच्या ओएसडीने राजेश डोकानिया यांना फोन करुन धमकी दिल्याचाही पुरावा आमच्याकडे आहे, असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
Previous Articleहॉट स्प्रिंग-गोगरामधून हटण्यास चीनचा नकार
Next Article मिरजेत शासकीय गोदामात आग








