बुधवारी शहरात 125 बाधित : एकूण कोरोनामुक्त 8,031 : बळी एकूण 383
प्रतिनिधी / सातारा
कोरोना संसर्गात वर्षभरात पाहता पाहता सातारा शहर व तालुका हे कोरोनासाठी हॉटस्पॉट ठरले आहे. अगोदर कराड हॉटस्पॉट ठरलेले असताना त्यानंतर सातारा शहरात कोरोनाने अक्षरशः कहर केला आहे. आजपर्यंत एकटय़ा सातारा शहर व परिसरात एकूण बाधितांची संख्या 9 हजार 234 एवढी प्रचंड आहे. तर त्यापैकी 8 हजार 31 जणांनी कोरोनामुक्त होत दिलासा दिलेला असला तरी शहरात एकूण बळींची संख्या 383 ही चिंताजनकच आहे.
गेल्या आठवडय़ापासून सातारा शहरातील परिस्थिती चिंताजनक असताना ज्या पध्दतीने सातारकर नागरिकांचे वागणे सुरु आहे तेही खूप चिंताजनकच आहे. येणाऱया मोठय़ा आकडय़ांच्या अहवालात सातारा शहर व तालुक्यातील बाधितांची संख्या 200 च्या पुढे येत असून त्यापैकी सातारा शहरात अधिक रुग्ण वाढताना दिसत आहेत. बुधवारी आलेल्या अहवालात सातारा तालुक्यात 247 बाधित समोर आले असून त्यापैकी 125 फक्त एकटय़ा सातारा शहर व परिसरात आहेत.
सध्या बेड मिळण्यात नागरिकांना अडचणी येवू लागल्या आहेत. साताऱयातील जम्बो हॉस्पिटल, सिव्हिल हॉस्पिटलात बेड उपलब्ध नसल्याने आरोग्य यंत्रणा रुग्ण दाखल करुन घेण्यास असमर्थता व्यक्त करत आहे. मात्र, दुसरीकडे शहरात लॉकडाऊन लावलेला आहे. फक्त गरज असल्यास अत्यावश्यक सेवा मिळाव्यात म्हणून सवलत दिलेली आहे त्याचाही गैरफायदा सातारकर घेत असल्याचे चित्र दुपारपर्यंत दिसून येत होते. त्यामुळे पोलिसांना कारवाईचा दंडुका उगारण्याची वेळ येवू लागली आहे.
घरात बसाल तरच वाचाल
सातारा शहरात वाढणारी बाधितांची संख्या चिंताजनक असताना नागरिकांकडून नियमांचे पालन करण्यात टाळाटाळ केली जातेय. जर वाढणारे आकडे रोखायचे असतील, संसर्ग साखळी तोडायची असेल तर घरात बसूनच कोरोनाशी लढावे लागणार आहे. काम नसेल तर बाहेर पडून उगाच स्वतःबरोबर दुसऱयांचा जीव धोक्यात टाकण्याचे काम काही बेशिस्त सातारकर करत आहेत. त्यांना स्वयंप्रेरणेने नियमांचे पालन करण्याची गरज आहे. कारण सध्या घरात बसाल, तरच वाचाल हा संदेश परिस्थिती देत आहे.
शहरात 920 ऍक्टिव्ह रुग्ण
आजमितीस स्थिती पॅनिक झालेली असताना सध्या सातारा शहर व परिसरात 920 रुग्ण ऍक्टिव्ह आहेत. त्यापैकी 758 रुग्ण होम आयसोलेट असून 162 रुग्ण प्रत्यक्ष दवाखान्यात उपचार घेत असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. डी. एच. पवार यांनी दिलीय. रुग्णांवर उपचार करण्यासाठी आरोग्य विभागाकडून यंत्रणा कार्यरत आहे. तर होम आयसोलेट असलेल्या रुग्णांचा आढावा देखील आरोग्य यंत्रणेकडून घेतला जात आहे.
नागरिकांकडून सहकार्य आवश्यक
सातारा शहर व उपनगरात होणारी बाधित वाढ रोखण्यासाठी नागरिकांनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे. रुग्ण संख्या कमी व्हावी. संसर्ग साखळी तुटावी यासाठी जर नागरिकांनी विनाकारण बाहेर न फिरता लॉकडाऊनचे नियम पाळले तर लवकर सातारा शहर व परिसरात कोरोनामुक्त होवू शकतो. संसर्ग साखळी तोडण्यासाठी नागरिकांकडूनच कृतीशील प्रयत्नांची गरज असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आलेय.
ग्रामीण भागानेही जोर धरलाय
सातारा शहर कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेय. ग्रामीण भागात मध्यंतरी कोरोनाचा जोर कमी होता. मात्र, एप्रिल महिन्यात तालुक्यातील विविध गावांमध्ये बाधित रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागलीय. बुधवारी आलेल्या अहवालात ग्रामीण भागात 118 बाधित संख्या समोर आलीय. ग्रामीण भागात आजपर्यंत एकूण रुग्ण संख्या 6 हजार 643 एवढी आहे. मात्र, त्यापैकी 5 हजार 568 जण कोरोनामुक्त झालेले आहेत. तर 137 जणांचा वर्षभरात कोरोना बळी गेलेला आहे.









