प्रतिनिधी/मिरज
कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करून त्यांना सातवा वेतन लागू करावा, यासह विविध मागण्यांसाठी मिरज शासकीय वैद्यकीय रुग्णालयात काम करणाऱ्या वैद्यकीय कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी गुरुवारी 24 तासासाठी कामबंद आंदोलन केले. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला. वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या कामबंद आंदोलनामुळे रूग्णालयात कामकाज ठप्प झाले होते.
मिरज शासकीय वैद्यकीय रुग्णालयाचे दीड वर्षांपूर्वी कोरोना रुग्णालयात रूपांतर केले आहे. येथे कंत्राटीवरील कर्मचारी अहोरात्र परिश्रम घेत आहेत. स्वतःचा जीव धोक्यात घालून कोरोना बाधित रुग्ण हाताळत आहेत. मात्र, त्यांच्या कामाचा योग्य मोबदला त्यांना दिला जात नाही. कंत्राटी कर्मचाऱ्यांना मिळणार पगार परवडत नाही. त्यामुळे सर्व कर्माचाऱ्यांना नोकरीत कायम करून सातवा वेतन आयोग लागू करावा, अशी मागणी आहे.