गेल्या काही आठवडय़ांपासून कोरोनाचे संक्रमण वेगाने वाढत आहे. याविषयीच्या अभ्यासातून असे दिसून आले आहे की, पूर्वीच्या तुलनेत आता एक बाधित रुग्ण अधिक जणांना संक्रमित करत आहे.
- पूर्वी कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात येणार्या 30 ते 40 टक्के लोकांना या विषाणूची लागण होत असे; मात्र आता हा आकडा 80 ते 90 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. याचाच अर्थ पूर्वी कोरोनाग्रस्त व्यक्तीच्या संपर्कात येऊनही 100 पैकी 60 ते 70 जण संक्रमित होत नसत; आता केवळ 10 ते 20 टक्केच लोक यापासून बचाव करु शकतात. त्यामुळेच आज अनेक कुटुंबेच्या कुटुंबे संक्रमित होताना दिसत आहेत.
- दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे, आधीच्या कोरोना लाटेच्या काळात दररोज सापडणार्या रुग्णांची संख्या कमी असायची. त्यावेळी लोक कोरोनापासून बचाव करण्यासाठी उपाययोजनांचा अवलंब करायचे. गर्दी कमी करत होते. पण आता लोकांमध्ये बेजबाबदारपणा वाढला आहे. संक्रमण रोखण्याबाबतची सतर्कता कमी झाली आहे. त्यामुळेच दररोज बाधित होणार्यांची संख्या वाढत आहे.
- सध्याची स्थिती पाहता कोविड केअर सेंटर्सची संख्या वेगाने वाढवावी लागणार आहे. गतवर्षी अशी केंद्रे उभी करण्यात आली होती; मात्र यावेळी आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. त्यामुळे वेगाने पावले टाकणे गरजेचे आहे.
- यावेळच्या लाटेमध्ये कोविडच्या रुग्णांमध्ये आढळणारी लक्षणे पाहिल्यास बरीचशी लक्षणे पूर्वीप्रमाणेच म्हणजेच सर्दी, घशात खवखवणे, ताप येणे, अंगदुखी, पोट बिघडणे, अस्वस्थ वाटणे उलटी होणे, डायरिया हीच आहेत. मात्र यावेळी या तक्रारींची संख्या वाढली आहे. त्यामुळे नागरिकांनी यापैकी लक्षणे जाणवू लागल्यास तातडीने कोविड चाचणी करुन घेणे आवश्यक आहे. जेणे करुन आपल्या कुटुंबाला संक्रमणापासून वाचवता येईल.
- सध्या देशात कोरोनाच्या दोन लसींद्वारे लसीकरण मोठय़ा प्रमाणावर होत आहे. 18 वर्षांवरील सर्वांना लसीकरणाची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी होताना दिसत आहे. मात्र माझ्या मते ती वेळ अद्याप आलेली नाही. याची अनेक कारणे आहेत. पहिले कारण म्हणजे कोरोनाचा सर्वाधिक धोका वयोवृद्ध नागरिकांना आहे. या वर्गाचे लसीकरण पूर्ण होणे गरजेचे आहे.
- आज देशात 18 वर्षांवरील नागरिकांची संख्या 97 कोटी इतकी आहे. प्रत्येक व्यक्तीला लसींचे दोन-दोन डोस द्यावे लागत आहेत. यादृष्टीने आपल्याला सुमारे 2 अब्ज लसींची गरज लागेल. जगभरातील सर्व लसी गोळा केल्या तरीही इतक्या लसी उपलब्ध होऊ शकणार नाहीत. अशा वेळी लसीकरणातील वयाचा प्राधान्यक्रम आपण रद्द केला तर कोविडचे वयोवृद्धांमधील आणि आजारग्रस्त म्हणजेच कोमॉर्बिडिटी असणार्या व्यक्तींमधील संक्रमण वेगाने वाढण्याची शक्यता आहे. तसेच मृत्यूचा आकडाही भयावह स्थिती गाठू शकतो.
- जागतिक आरोग्य संघटना, अमेरिका, युरोप येथेही लसीकरणाच्या प्राधान्यक्रमाबाबत सकारात्मक आहेत. कारण कोणत्याही देशाकडे पर्याप्त लसी उपलब्ध नाहीत. त्यामुळे आजघडीला देशात व्यवस्थितपणे लसीकरण सुरु आहे आणि ते अशाच प्रकारे गतीमानतेने सुरु राहणे योग्य आहे.
- सिरो सर्वेनुसार आजघडीला 21 टक्के लोकांमध्ये अँटीबॉडीज तयार झाल्या आहेत. याचाच अर्थ 80 टक्के लोकांना आजही धोका आहे. लसीमुळे आपल्याला इम्युनिटी मिळते. पण याचा अर्थ तुमचा संक्रमणापासून बचाव होतो असा नाही.
- एफिकेसी ट्रायलमध्येही लसींची परिणामकारकता 70 ते 80 टक्केच राहिली होती. याचाच अर्थ 20 ते 30 टक्के लोक लसी घेतल्यानंतरही सुरक्षित राहू शकणार नाहीत. मात्र लस घेतल्यानंतरही कोरोनाची लागण झाली तरी गंभीर स्थिती उद्भवत नाही. खास करुन आयसीयूमध्ये दाखल करण्याची किंवा व्हेंटीलेटर लावण्याची वेळ येत नाही. त्यामुळे लसीकरण अत्यंत गरजेचे आहेच; पण त्याबरोबरीने किंबहुना त्याहून अधिक महत्त्वाची आहे ती कोरोना नियमांची अमलबजावणी !









