हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत प्रचारफेरी : संजय राऊत यांच्या उपस्थितीने उत्साह

प्रतिनिधी / बेळगाव
मध्यवर्ती म. ए. समितीचे उमेदवार शुभम शेळके यांनी बुधवारी शिवाजी उद्यान येथून भव्य प्रचारफेरी काढली. यावेळी हजारो तरुणाईच्या उपस्थितीत समितीने शक्तिप्रदर्शन केले. या प्रचार फेरीमध्ये शिवसेना नेते संजय राऊत सहभागी झाल्याने युवकांमध्ये मोठा उत्साह पहायला मिळाला. संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. या प्रचारावेळी अभूतपूर्व अशी गर्दी पहायला मिळाली.
सायंकाळी शिवाजी उद्यान येथून काढण्यात आलेल्या भव्य प्रचारफेरीमध्ये बेळगाव शहरातून गावागावातून हजारोंच्या संख्येने तरुण सहभागी झाले होते. या प्रचारफेरीमध्ये संजय राऊत यांच्यासोबत खासदार धैर्यशिल माने, शिवसेना नेते संग्रामसिंग कुपेकर, कोल्हापूर जिल्हा प्रमुख विजय देवणे, संपर्क प्रमुख अरविंद नागनुरी, जिल्हा प्रमुख प्रकाश शिरोळकर सहभागी झाले होते. शिवाजी उद्यान, कपिलेश्वर रोड, हेमूकलानी चौक, टिळकचौक मार्गे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौकातील महाराजांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. त्यानंतर संयुक्त महाराष्ट्र चौकात सभास्थळी प्रचारफेरीची सांगता झाला.
बेळगावमध्ये संजय राऊत यांचे जोरदार स्वागत बेळगाव विमानतळावर दाखल झाल्यानंतर मुतगा येथे संजय राऊत यांनी शिवमूर्तीला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर एस. सी. मोटर्स रोडवर बेळगावमधील विविध मराठी संघटना व त्यांच्या पदाधिकाऱयांनी संजय राऊत यांचे जोरदार स्वागत केले. गोवावेस येथील रामलिंगवाडी येथील सिद्धिविनायक मंदिरात जावून दर्शन घेतले. यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला. यामुळे या परिसरात भगवेमय वातावरण तयार झाले होते.
खडक गल्ली, भडकल गल्लीचा शुभम शेळके यांना पाठिंबा
बेळगाव : मध्यवर्ती म. ए. समितीचे उमेदवार शुभम शेळके यांना खडक गल्ली, भडकल गल्ली, इंदिरा कॉलनी येथील युवक मंडळे व सल्लागार कमिटीने जाहीर पाठिंबा दिला आहे. मंगळवारी शुभम शेळके यांचा या परिसरात प्रचार करण्यात आला. यावेळी मराठी भाषिक कार्यकर्त्यांनी त्यांचे भव्य स्वागत केले.
फटाक्मयांची आतषबाजी करून स्वागत करण्यात आले. मराठी भाषा आणि संस्कृती यासाठी म. ए. समितीने लोकसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवार दिला आहे. त्यांना शहराच्या सर्वच भागातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. मंगळवारी शेळके यांचा खडक गल्ली येथील मरगाई मंदिरात युवक मंडळाच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी मोठय़ा संख्येने खडक गल्ली, भडकल गल्ली व इंदिरा कॉलनी येथील तरुण कार्यकर्ते उपस्थित होते.









