ऑनलाईन टीम / लखनऊ :
समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी आजच सकाळी ट्विट करत आपल्याला कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती दिली होती. त्यानंतर आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना देखील कोरोनाचा संसर्ग झाला आहे. योगी आदित्यनाथ यांनी स्वत: ट्विट करत ही माहिती दिली आहे.
योगी आदित्यनाथ यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले की, सुरुवातीची लक्षणे दिसल्यानंतर मी कोरोना चाचणी केली असता, रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या मी विलगीकरणात आहे आणि डॉक्टरांनी दिलेल्या सूचनांचे पूर्णपणे पालन करत आहे.
पुढे ते म्हणाले, सर्व कामे व्हर्च्युअल माध्यमातून सुरू आहेत. राज्य सरकारची सर्व कामे सामान्यपणे सुरू आहेत. तसेच या काळात माझ्या संपर्कात आले त्यांनी स्वतःची चाचणी करून घ्यावी आणि अधिक खबरदारी घ्यावी असे आवाहनही त्यांनी यावेळी केले आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी 5 मे रोजी कोरोनाचा पाहिला डोस घेतला होता. तरी देखील त्यांनी कोरोनाची बाधा झाली आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कार्यालयातील अनेक अधिकाऱ्यांना यापूर्वी कोरोनाचा संसर्ग झाला आहे. यामध्ये मुख्य सचिव शशी प्रकाश गोयल, विशेष सचिव अमित कुमार सिंह, ओएसडी अभिषेक कौशिक यांच्यासह एक पर्सनल सचिव आणि सहाय्यकास देखील कोरोनाची लागण झाली आहे. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी स्वतःला आयसोलेट करून घेतले होते.