प्रतिनिधी / बेळगाव
स्मार्ट सिटी योजनेंतर्गत रस्त्यांचा विकास आणि गटारींचे बांधकाम तसेच विविध सुविधा उपलब्ध करण्यात येत आहेत. पण नियोजनाअभावी शहरवासियांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. एसपीएम रोडशेजारी छत्रपती शिवाजी महाराज उद्यानासमोरील गटारीचे बांधकाम करण्यात आले होते. मात्र, आता ते पुन्हा फोडण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे निधीचा अपव्यय झाल्याची तक्रार नागरिक करीत
आहेत.
स्मार्ट सिटीमध्ये शहराचा समावेश झाल्यानंतर आराखडा तयार करण्याची सूचना करण्यात आली होती. त्यानुसार महापालिकेने 3800 कोटींच्या विकासकामांचा आराखडा तयार केला होता. यापैकी 1 हजार कोटी केंद्र आणि राज्य शासनाने देऊ केले आहेत. उर्वरित रक्कम बांधा, वापरा आणि हस्तांतर करा, अशा तत्त्वावरील प्रकल्पांमध्ये तरतूद करण्याची होती. मात्र, या तत्त्वावरील एकही काम मार्गी लागले नाही. स्मार्ट सिटी कंपनीने आतापर्यंत 1 हजार कोटींची विकासकामे राबविण्यावर भर दिला आहे. यापैकी काही कामे व्यवस्थित झाली नसल्याची तक्रार होत आहे. एसपीएम रोड येथील रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यासाठी प्रथम गटारींचे बांधकाम करण्यात आले. हे काम पूर्ण झाल्यानंतर रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचे काम सुरू करण्यात आले. पण या कामामध्ये सातत्य नसल्याने तब्बल दोन वर्षे लागून रस्त्यांचे काँक्रिटीकरण झाले आहे. मात्र, सदर काम व्यवस्थित झाले नसल्याचे आढळून येत आहे. ठिकठिकाणी चरी आणि रस्ता खाली-वर झाल्याचे दिसून येते. त्यामुळे स्मार्ट सिटीची कामे करताना नियोजनाचा अभाव असल्याची तक्रार नागरिक करीत आहेत. दोन वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या गटारी आता फोडण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
त्यामुळे यापूर्वी खर्ची घालण्यात आलेला निधी वाया गेला आहे. कोणतेही काम करण्यापूर्वी त्याची गरज व त्याचे महत्त्व याबाबत अभ्यास केला जातो. मात्र, स्मार्ट सिटीची कामे करताना कोणताच विचार केला जात नसल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. त्यामुळेच लाखो रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या गटारी फोडण्यात आल्याने निधीचा दुरुपयोग झाला आहे. त्यामुळे स्मार्ट सिटीच्या कामाबद्दल नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. शहापूर खडेबाजार रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात आले आहे. पण पावसाचे पाणी किंवा गटार तुंबल्यानंतर सांडपाणी रस्त्यावरून वाहत आहे. वळीव पावसामुळे गटारींचे पाणी काही व्यावसायिक आस्थापनांमध्ये शिरल्याची घटना घडली आहे. त्यामुळे नित्कृष्ट आणि अयोग्य नियोजनाच्या कामाला जबाबदार कोण? असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे.









