वृत्तसंस्था / वॉशिंग्टन
रशियाकडून एस-400 क्षेपणास्त्र यंत्रणा खरेदी केल्यास भारतावर निर्बंध लादण्याची धमकी अमेरिकेने अनेकदा दिली आहे. अमेरिकेचे संरक्षणमंत्री लॉयड ऑस्टिन यांनीही आमच्या मित्रांनी रशियाकडून शस्त्रखरेदी टाळावी असे भारत दौऱयादरम्यान म्हटले होते. तर भारतावर निर्बंध लादण्याच्या मुद्दय़ावर अमेरिकेच्या खासदारांमध्ये दोन गट पडले आहेत. भारतावर काउंटरिंग अमेरिका ऍडवर्सरीज थ्रू सॅक्शंन्स ऍक्ट (काटसा) अंतर्गत निर्बंध लादले गेल्यास हा रशियाचा भूसामरिक विजय ठरणार असल्याचे उद्गार रिपब्लिकन पार्टीचे नेते टोड यंग यांनी काढले आहेत.
अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांच्या प्रशासनाने भारतावर निर्बंध लादल्यास यामुळे महत्त्वपूर्ण काळात दोन सामरिक आघाडय़ा कमकुवत होतील, यामुळे भारतासोबतचे अमेरिकेचे संबंध कमजोर होण्यासाठी चीनविरोधातील क्वाडची क्षमताही प्रभावित होणार असल्याचे सिनेटच्या विदेश विषयक समितीचे सदस्य यंग यांनी नमूद केले आहे.
डेमोक्रेटिक नेत्याची निर्बंधांची मागणी
सिनेटच्या विदेश विषयक समितीचे डेमोक्रेटिक अध्यक्ष बॉब मेनेंडेज यांनी भारताने रशियन सुरक्षा प्रणाली खरेदी करण्याच्या दिशेने पाऊल टाकल्यास त्याला निर्बंधांचा इशारा देण्यास सांगितले होते. अमेरिकेच्या निर्बंधांमुळे भारताला एस-400 क्षेपणास्त्र प्रणाली खरेदी करण्यापासून रोखता येणार नाही. आंतरराष्ट्रीय सहकार्यावरून भारताचा ऐतिहासिक संशयवाद आणि रशियासोबतचे जुने संबंध पाहता हे शक्य नसल्याचे यंग यांनी म्हटले आहे.
भारताला सूट मिळावी
रशिया भारताचा सैन्य भागीदाराच्या स्वरुपात स्वतःच्या भूमिकेचा पुन्हा दावा करण्यासाठी निर्बंधांचा लाभ उचलू शकतो. रशियाच्या प्रणालीवरून भारतावर निर्बंध लादणे प्रत्यक्षात रशियाचा भूसामरिक विजय ठरणार आहे. बायडेन प्रशासनाने भारताला काट्सापासून सूट द्यावी. भारताला रशियन प्रणाली खरेदी करण्याची अनुमती देत बायडेन प्रशासन अमेरिकेसाठी मुख्य भूसामरिक धोका चीन असल्याचे स्पष्ट करू शकते, असे यंग यांनी म्हटले आहे.
अमेरिकन ऍडमिरलही भारताच्या बाजूने
अमेरिकन सैन्याच्या इंडो-पॅसिफिक कमांडचे भावी प्रमुख ऍडमिरल जॉन एक्वीलिनो यांनी भारत-रशिया संबंधांवरून अमेरिकेच्या संसदेला सुनावले हेते. सुरक्षा सहकार्य आणि सैन्यसामग्रीसाठी भारताचे रशियासोबत जुने संबंध आहेत. रशियाकडून भारताने एस-400 यंत्रणा खरेदी केल्यास निर्बंध लादले जाऊ नयेत अशी भूमिका ऍडमिरल एक्वीलिनो यांनी मांडली होती. निर्बंधांऐवजी भारताला रशियापासून दूर करण्याचा प्रयत्न केला जावा. भारताला पर्याय उपलब्ध करण्याचे पाऊल अधिक चांगले ठरणार असल्याचे त्यांनी म्हटले होते.