ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
जॉन्सन अँड जॉन्सनची कोरोना लस घेतल्यानंतर शरीरात रक्ताच्या गाठी होण्याची सहा प्रकरणे समोर आली आहेत. त्यामुळे अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाने (FDA) या लसीचा वापर तात्पुरत्या काळासाठी थांबवण्याची शिफारस केली आहे.
जॉन्सन अँड जॉन्सनची लस घेतल्यानंतर काही दिवसात सहा महिलांमध्ये रक्ताच्या गाठी होणे आणि प्लेटलेटची संख्या कमी झाल्याचे समोर आले. या रुग्णांच्या अहवालांची चौकशी केली जात असल्याचे सेंटर फॉर डिसिज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (सीडीसी) आणि अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मंगळवारी संयुक्त निवेदनात म्हटले आहे.
या महिलांचे अहवाल तपासल्यानंतर लसीच्या वापराबद्दलचा पुढील निर्णय होणार आहे. दरम्यान, अमेरिकेत या लसीचे 6.8 दशलक्षाहून अधिक डोस देण्यात आले आहेत.