प्रतिनिधी/नागठाणे:
सातारा तालुक्यातील शेवटचे टोक असलेल्या तुकाईवाडी येथे गेल्या काही महिन्यांपासून कराड तालुक्यातील एका ठेकेदाराकडून अवैधरित्या मुरुमाचे उत्खनन केले गेले आहे. दोन ठिकाणी करण्यात आलेल्या उत्खननात हजारो ब्रास मुरुम संबंधित ठेकेदाराने गायब केल्याची चर्चा असून या सर्व प्रकाराकडे येथील महसूल विभागाचे मात्र सोयीस्कररित्या दुर्लक्ष झाले आहे. शासनाला लाखो रुपयांचा चुना लावणाऱ्या या ठेकेदाराला नेमका वरदहस्त कोणाचा? याची खुमासदार चर्चा सध्या गावात सुरू आहे.
तुकाईवाडी हे गाव सातारा – कराड या दोन तालुक्याच्या बाँड्रीवरील सातारा तालुक्यातील शेवटचे गाव आहे. या गावातून कराड तालुक्यातील कालगाव येथे जाण्यासाठी रस्ता गेला आहे. मिळालेल्या माहितीनुसार गेल्या काही महिन्यांपासून तुकाईवाडी-कालगाव रस्त्यालगत मराठी शाळेपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या दोन टेकडीनुमा ठिकाणी मोठ्या प्रमाणात टेकड्या फोडून मुरुमाचे उत्खनन करणे सुरू आहे. शनिवारी रात्री उशिरा या ठिकाणी एक जेसीबी व चार डंपरच्या साहाय्याने मरूम काढणे सुरू होते. जवळच्याच कराड तालुक्यातील एका गावातील ठेकेदाराने हा प्रताप सुरू केला होता. मात्र याची कल्पना भागातील काही पत्रकारांना लागल्याची माहिती समजताच संबंधित ठेकेदाराने वाहनासह तेथून पोबारा केला.
या दोन्ही ठिकाणांहून संबंधिताने हजारो ब्रास मुरुमाचे अवैधरित्या उत्खनन केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे शासनाला मिळणाऱ्या मोठ्या रॉयल्टीला मुकावे लागले आहे. काही दिवसांपूर्वी सातारा प्रांताधिकाऱयांनी येथे व्हिजिट केल्याचे समजते. मात्र त्यावेळी त्यांना फक्त एकाच ठिकाणचे उत्खनन दाखवण्यात आल्याचे समजते. तेथून जवळच झालेल्या दुसऱ्या अवैध उत्खनानाची माहिती लपविण्यात आल्याचे समजते. तसेच तदनंतर संबंधित ठिकाणचा पंचनामा झाला का? त्याबाबत कोणती कारवाई केली ? याबाबत कोणतीच माहिती मिळाली नाही.त्यामुळे अवैधरित्या उत्खनन करणाऱ्या संबंधित ठेकेदाराला नेमके कोण पाठीशी घालतोय? या अवैध उत्खनना मागे कोणा- कोणाचे हात ओले झाले आहेत ? महसूल प्रशासनाकडून चोर सोडून संन्याशाला तर बळी देण्याचा प्रकार होणार नाही ना? याचीच खुमासदार चर्चा गावात सुरू आहे.









