कोरोना नियमांचा भंग, पोलिसांच्या कारवाईलाही कोणी जुमानेना
प्रतिनिधी / मिरज
शनिवार आणि रविवारचा विकेंड लॉकडाऊन समाप्त होताच सोमवारी सकाळपासून मिरज शहरातील सर्वच बाजार पेठांमध्ये खरेदीसाठी झुंबड उडाली. उद्या होणारा गुढीपाडवा आणि संभाव्य लॉकडाऊनमुळे नागरीकांना बाजार पेठांमध्ये खरेदी दरम्यान कोरोनाचे भान राहिले नाही. सकाळी महापालिका आणि पोलिसांच्या पथकाकडून कारवाई सुरू असतानाही त्यास कोणी जुमानत नव्हते. त्यामुळे कोरोना नियमांचा भंग होऊन सोशल डिस्टनच्या चिंधड्या उडाल्या. अत्यावश्यक सेवा वगळता अन्य किरकोळ दुकाने बंद करण्यात आली. मात्र, भाजी बाजार आणि किराणा दुकानांमध्ये गर्दी होती. या गर्दीकडे मात्र, प्रशासनाचे दुर्लक्ष झाले.
विकेंड लॉकडाऊननंतर 7 किंवा 15 दिवसांचा कडक लॉकडाऊन लागणार, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. सोमवारी सकाळी दुकाने उघडणार किंवा नाही, याबाबतही लोकांमध्ये साशंकता होती. मात्र, सोमवारी सकाळपासूनच लक्ष्मी मार्केट परिसर, लोणी बाजार, दत्त चौक, गाडवे चौक येथे मोठ्या प्रमाण भाजार भरला. सराफ पेठही सुरू झाली. त्यामुळे खरेदीसाठी नागरिकांची गर्दी सुरू झाली. या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी महापालिका आणि पोलीस प्रशासन रस्त्यावर उतरले. त्यानंतर काही काळासाठी भाजी विक्रेते पळून गेले. अत्यावश्यक सेवा वगळता अन्य दुकानेही बंद झाली. मात्र, काही वेळानंतर पुन्हा बाजार सुरू झाला. तेव्हा प्रशासनाच्या कारवाईलाही कोणी जुमानत नव्हते. गुढी पाडव्याला साखर माळेची खरेदी, भाजीपाला, फळभाज्या खरेदी आणि धान्य दुकानामध्ये दिवसभर गर्दी होते.