भाजपात घुसमट होणाऱयांनी आपमध्ये यावे : दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांचे आवाहन. कार्यकर्त्यांना केले मार्गदर्शन
प्रतिनिधी / पणजी
पहिले मुख्यमंत्री स्व. भाऊसाहेब बांदोडकर हे गोव्याचे शैक्षणिक संस्थापक होते तर माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे विकासाचे संस्थापक होते. परंतु पर्रीकरांच्या मृत्यूनंतर जे गोव्याच्या विकासाचे ध्येय, लक्ष्य होते तेच नष्ट झाले. परिणामी त्यांच्या सोबत काम केलेल्या ध्येयवादी, प्रामाणिक, समविचारी कार्यकर्त्यांची सध्या प्रचंड घुसमट होत आहे. त्यांना दुर्लक्षित, अपमानीत करण्यात येत आहे. अशा सर्वांनी आम आदमी पक्षात यावे. आम्ही त्यांना त्यांचा सन्मान पुन्हा मिळवून देऊ. तसेच त्यांचे विचार, सल्ल्यानुसार गोवा घडविण्याचे, त्यांची स्वप्नपूर्ती करण्याचे प्रयत्न करू, असे आवाहन दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी केले.
पणजीत काल रविवारी आयोजित पक्ष कार्यकर्त्यांना मार्गदर्शनपर कार्यक्रमात ते बोलत होते. व्यासपीठावर त्यांच्यासोबत निमंत्रक राहूल म्हांबरे, ऍड. सुरेल तिळवे, ऍड. प्रतिमा कुतिन्हो, बाणावलीचे जिल्हा पंचायत सदस्य हेंजल यांची उपस्थिती होती.
केवळ भाजपच्याच नव्हे तर आपची ध्येयधोरणे मान्य असलेल्या आणि गोव्याचे भवितव्य आणि भल्यासाठी काम करण्याची इच्छा आणि आवड असलेल्या, एक वेगळे ध्येय, स्वप्न बाळगणाऱया प्रत्येकाने या पक्षाशी संलग्न व्हावे, आम्ही त्यांचे स्वागत करू, असे सिसोदिया पुढे म्हणाले.
घाणेरडय़ा, भ्रष्ट राजकारणाला लोक कंटाळले
गोव्यातील लोक भाजपा आणि काँग्रेसच्या घाणेरडय़ा, भ्रष्ट राजकारणाला कंटाळले आहेत, दुःखी झालेले आहेत. गेल्या कित्येक वर्षांपासून गोमंतकीय एकतर काँग्रेस किंवा भाजप यांनाच सत्तेची संधी देत होते. यापुढे तसे होणार नाही. कारण आता आम आदमी पक्षाच्या रुपाने नवा पर्याय सापडला आहे. याचा पुरावा त्यांनी गत जिल्हा पंचायत निवडणुकीत आपच्या बाणावलीतील उमेदवारास विजयी करून दिलाच आहे. त्याशिवाय नावेलीतही आपच्या उमेदवारास भरघोस मतदान केले होते. दुर्दैवाने तो विजयी झाला नसला तरी द्वितीय स्थानी आला होता. सध्या गत सहा महिन्यांपासून गोव्यात प्रचंड वेगाने पक्षाचा विस्तार होत आहे. त्याशिवाय आपच्या मतदान टक्केवारीतही 15 टक्के वाढ झाली आहे, ही फार समाधानकारक बाब आहे, असे सिसोदिया म्हणाले.
आम आदमी पार्टी दिवसेंदिवस गोव्यात बळकट होत आहे. नव्या दमाचे तरूण, वकील, अभियंते, यासारखे उच्च शिक्षित लोक या पक्षाकडे आकर्षित होत आहेत. यावरून गोव्यातील लोक भाजप आणि काँग्रेसच्या राजकारणाला कंटाळले असल्याचा पुरावाच मिळत आहे. मेळावली सारख्या गावात एका आंदोलनाच्या माध्यमातून पुढे आलेल्या एका युवा अभियंत्याच्या नेतृत्वाखाली असंख्य लोक आप मध्ये प्रवेश करतात यावरून त्यांना स्थानिक नेतृत्वाबद्दल किती चीड आहे, त्यांची कशी घुसमट होत होती, तेच दिसून येते. आज सत्तास्थानी असतानाही भाजपकडे जेवढे प्रामाणिक कार्यकर्ते नसतील त्यापेक्षा जास्त प्रमाणिक, निस्वार्थी, गोव्याचे भले व्हावे या ध्येयाने आणि तळमळीने वावरणारे कार्यकर्ते आपकडे आहेत, असे सिसोदिया म्हणाले.
भाजप, काँग्रेसमध्ये मतदारांना स्वातंत्र्यच नाही
भाजप आणि काँग्रेसने सध्या एक विचित्र पायंडा घालून दिला आहे तो म्हणजे मत कुणालाही दिले तरी जो पक्ष आमदार विकत घेऊ शकतो त्याचे सरकार बनते. अशा परिस्थितीत मतदारांना स्वातंत्र्यच राहत नाही. एका पक्षाला हरविण्यासाठी दुसऱया पक्षास संधी दिली तरी निकालानंतर दोन्ही पक्षांचे लोक एकत्र येतात व एकमेकांची खरेदी करून जनतेच्या मताविरुद्ध सरकार घडवतात. परिणामी जनतेच्या मतानुसार सरकार बनतच नाही, पैशांच्या देवाणघेवाणीनुसार सरकार बनते. अशा वेळी गोमंतकीयांनी सखोल विचार करून या दोन्ही पक्षांना सत्तेपासून दूर ठेवावे व एक असा गोवा बनवविण्यासाठी पुढे यावे ज्यात राज्याचा आणि त्यांचा स्वतःचाही विकास असेल, असे सिसोदिया यांनी सांगितले.
व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते समई प्रज्वलित करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. सिसोदिया यांना गोव्याची पारंपरिक समई प्रदान करून सन्मान करण्यात आला. पणजी मनपा निवडणुकीत आपच्या पाठिंब्यावर निवडणूक लढविलेले भाजप कार्यकर्ते भारती हेबळे आणि दामोदर वायंगणकर यांना आपमध्ये रितसर प्रवेश देण्यात आला. त्याशिवाय मेळावलीतील आयआयटी विरोधी आंदोलन यशस्वी करणारे कार्यकत्यांनाही सिसोदिया यांनी आपमध्ये प्रवेश दिला. प्रतिमा कुतिन्हो, हेंजल, म्हांबरे, ऍड. तिळवे यांचीही भाषणे झाली. प्रवक्ता विल्मिकी नाईक यांनी सूत्रसंचालन केले.
कोरोनामुळे कार्यक्रमास कार्यकर्त्यांची मर्यादित उपस्थिती असली तरीही राज्याच्या अन्य विविध भागातील कार्यकर्त्यांसाठी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हा कार्यक्रम थेट पाहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. सुमारे चार हजार कार्यकर्त्यांनी त्याचा लाभ घेतला, असे यावेळी सांगण्यात आले.
कोकणी अकादमीसाठी पाच कोटी देणार
ज्या राज्याची स्वतःची राजभाषा कोकणी आहे तेथे स्थापन असलेल्या कोकणी अकादमीसाठी सरकार वार्षिक केवळ एक कोटी रुपये देते. त्यातील 80 लाख रुपये हे केवळ कर्मचाऱयांचा पगारावरच खर्च होतात आणि शिल्लक 20 लाख रुपये भाषेचा विकास आणि अन्य योजनांसाठी खर्च करण्यात येतात. या पार्श्वभूमीवर आता अरविंद केजरीवाल सरकारने दिल्लीत कोकणी अकादमी स्थापन केली आहे. त्यासाठी आम्ही तब्बल पाच कोटी रुपये देणार आहोत, अशी घोषणा सिसोदिया यांनी केली.









