प्रतिनिधी/ रत्नागिरी
जिल्हय़ात रविवारी विकेंड लॉकडाऊनला दुसऱया दिवशीही नागरिकांनी कडकडीत बंद पाळत प्रतिसाद दिला. रस्ते सामसुम आणि सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे जिल्हय़ात विकेंड लॉकडाऊन दोन दिवस यशस्वी झाल्याचा दिसला.
कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेता शासनाने संपूर्ण महाराष्ट्रात शनिवार आणि रविवार विकेंड लॉकडाऊन जाहीर केला आहे. या दोन्ही दिवशी रत्नागिरी जिल्हय़ातून 100 टक्के प्रतिसाद मिळाला. दोन दिवस रत्नागिरीचे रस्ते सामसुम दिसत होते. तसेच किराणा आणि भाजीपाला व्यावसायिकांनीही आपली दुकाने बंद ठेवली होती. त्यामुळे बाजारपेठेतील आर्थिक व्यवहार ठप्प झाले होत. केवळ मेडिकल व इतर अत्यावश्यक सेवा सुरू होती.
चिपळुणात आज वातावरण तापण्याची शक्यता
सद्यस्थितीत लॉकडाऊन हे परवडणारे नाही, असे म्हणत 12 एप्रिलपासून सर्व दुकाने उघडण्याच्या आपल्या भूमिकेवर येथील व्यापारी ठाम आहेत तर दुसरीकडे नियम मोडल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. त्यामुळे येथील वातावरण आज तापण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
संगमेश्वरात शुकशुकाट
विकेंड लॉकडाऊनला दुसऱया दिवशीही संगमेश्वर तालुक्यातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत घरीच राहणे पसंत केले. त्यामुळे बाजारपेठांमध्ये शुकशुकाट पसरला होता. संगमेश्वर तालुक्यातील मुख्य बाजारपेठांमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता इतर सेवा बंद होती.
राजापुरात कडकडीत बंद
राजापूर तालुक्यातील सागरी पोलीस ठाणे नाटे हद्दीत नागरिकांसह व्यापाऱयांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. येथील नागरिकांनी शासनाचे नियम पाळून कडकडीत बंद केला. तसेच नियमांचे उल्लंघन न केल्याने पोलिसांनाही कोणत्याही प्रकारचा त्रास नागरिकांनी दिला नाही.
खेड आगारात शुकशुकाट
रविवारच्या लॉकडाऊनमुळे खेड बसस्थानक एसटी बसेस व प्रवाशांअभावी ओस पडले होते. मोजकेच एसटी चालक-वाहक व कर्मचारी स्थानकात हजर होते. त्यामुळे परिसरात शुकशुकाट पसरला होता. बाजारपेठांमध्येही तीच परिस्थिती होती.
दापोलीत छोटय़ा-मोठय़ा व्यावसायिकांना झळ
दापोली तालुक्यात अनेक समुद्रकिनाऱयांवर पर्यटक येत नसल्यामुळे हातगाडय़ा उभ्या करून छोटे-मोठे व्यवसाय करणाऱयांवर उपासमारीची वेळ येवू ठेपली आहे. या लॉकडाऊनची झळ आम्हाला चांगलीच बसल्याचे येथील व्यावसायिकांनी सांगितले. रविवारी दुसऱया दिवशी बाजारपेठेत शांतता होती.









