एके-47 पासून विमानविरोधी गनही सहजपणे उपलब्ध
प्रत्येक देशाच्या शस्त्रास्त्राचे डुप्लिकेटही होते प्राप्त
पाकिस्तानच्या पेशावरमधील दर्रा अदमखेल हे ठिकाण अवैध शस्त्रास्त्रांची फॅक्ट्री तसेच तस्करीसाठी जगभरात कुख्यात आहे. येथे एंटी एअरक्राफ्ट गन, मोर्टार, रॉकेट लाँचर आणि एके-47 पर्यंत कुठल्याही शस्त्रास्त्राचे नाव घ्या, येथे उपलब्ध होते आणि ते देखील अत्यंत कमी किमतीत. पेशावरपासून सुमारे 35 किलोमीटर अंतरावर गोळय़ा झाडल्या गेल्याचा आवाज ऐकू आल्यास दर्रा अदमखेल नजीक असल्याचे ओळखावे. टेकडय़ांदरम्यान वसलेल्या एक लाख लोकसंख्येच्या या शहरात अवैध शस्त्रास्त्रांच्या सुमारे 100 फॅक्ट्री आहेत.
यात पिस्टल, एंटी एअरक्राफ्ट गन, एलएमजी, मशीनगन, मोर्टार, शॉटगनपासून अमेरिकन एम-4 कार्बाइन आणि रशियन कलाश्निकोव्ह (एके-47) रायफल तसेच ग्रेनेड सर्वकाही तयार होते. खरेदीदार सर्वप्रथम फायर टेस्ट करतो, याचमुळे दिवसभर गोळय़ा झाडण्याचा आवाज ऐकू येत राहतो. दर्रा अदमखेलमध्ये सुमारे 2000 हजार दुकाने असून यातील 1800 पेक्षा अधिक शस्त्रास्त्रविक्रीची आहेत.
5-6 लाखाची गन 30-35 हजारात

पाकिस्तानच्या या शहरात 5-6 लाख रुपयांमध्ये प्राप्त होणारी विदेशी गन 30-35 हजार रुपयांमध्ये तयार केली जाते. येथील कारागिर अमेरिका, जर्मनी, तुर्कस्तान, चीन, रशिया कुठल्याही देशाच्या शस्त्रास्त्राची डुप्लिकेट तयार करू शकतात. पण काही काळापासून सरकारी निर्बंधांमुळे येथील उलाढाल कमी झाली आहे.
अवैध शस्त्रास्त्रनिर्मितीत अव्वल
येथील काही कुटुंबे तर 50 वर्षांपासून अवैध शस्त्रास्त्रनिर्मिती करत आहेत. दर्रा अदमखेल आता स्वायत्त क्षेत्रातून हटल्याने अनेक बंधने लागू झाली आहेत. पण अद्यापही पाकिस्तानात सर्वाधिक अवैध शस्त्रास्त्रांची निर्मिती येथेच होते. येथील 90 टक्के रोजगार शस्त्रास्त्रांच्या व्यापारातच आहे.









