प्रतिनिधी / नागठाणे :
पुणे महाराष्ट्र राज्य सरपंच परिषदेच्या सातारा तालुका उपाध्यक्षपदी वेणेगाव (ता.सातारा) येथील उपसरपंच हिंदुराव महानु शिंदे यांची निवड करण्यात आली.
सर्वसामान्य नागरिकांच्या मुलभूत न्याय हक्कासाठी संघटनेच्या माध्यमातून विविध प्रश्न मार्गी लावून अनेक वेळा आंदोलनासारखे मार्ग निवडून शासन स्तरावर सामान्य जनतेसाठी आपला वेळ व पैसा खर्ची टाकणारा हा सामाजिक कार्यकर्ता व त्याचे कार्य याचे अवलोकन करून, त्यांना हा तालुक्याचा पदभार देण्यात आला असल्याचे पुणे महाराष्ट्र सरपंच परिषदेचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भोसले यांनी जाहीर केले. वेणेगाव येथील सरपंच परिषदेच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी बैठकीदरम्यान उपस्थितांना मार्गदर्शन व संस्थेचे ध्येयधोरणे स्पष्ट करताना ते बोलत होते.
निवडीनंतर बोलताना हिंदुराव शिंदे म्हणाले, सरपंच परिषदेने माझ्यावर टाकलेला विश्वास मी सार्थ करून दाखवेन. या तालुक्यातील ग्रामपंचायती व त्यामध्ये असणारे कर्मचारी या सर्वांना बरोबर घेऊन गावाचा विकास करण्यासाठी जे-जे करता येईल, ते-ते करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करेन. माझ्या या कार्यास सर्व पदाधिकारी व सहकारी सहकार्य करतील, याचा मला विश्वास आहे असेही शिंदे म्हणाले.









