ऑनलाईन टीम / अहमदाबाद :
कोरानावरील उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या ‘रेमडेसिवीर’ इंजेक्शनचा देशभरात तुटवडा असताना सुरतमधील भाजप कार्यालयात मात्र, हे औषध रुग्णांना मोफत दिले जात असल्याचे समोर आले आहे. गुजरातचे भाजप अध्यक्ष सी आर पाटील यांनी दावा केला आहे की, भाजप कार्यालयात रुग्णांच्या नातेवाईकांना 5 हजार ‘रेमडेसिवीर’ इंजेक्शन मोफत दिली जात आहेत. देशात ‘रेमडेसिवीर’ स्टॉकमध्ये नसताना भाजपच्या कार्यालयात पाच हजार इंजेक्शनचा साठा येतो कुठून? असा सवाल करत विरोधी पक्षांनी भाजपला धारेवर धरले आहे.
रेमडेसिवीर इंजेक्शन घेण्यासाठी भाजपच्या कार्यालयात बाधितांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. दरम्यान, ‘देशात रेमडेसिवीरचा तुटवडा असताना सुरतमधील भाजप कार्यालयात रेमडेसिवीर इंजेक्शन मोफत मिळत आहे. हे राजकारण नाही, तर काय ?’ असा सवाल अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.