प्रशांत किशोर यांची ध्वनिफित व्हायरल- ममतांच्या व्यूहनीतिकारामुळे तृणमूलची कोंडी
तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा तसेच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे निवडणूक व्यूहनीतिकार प्रशांत किशोर यांनी भाजपचा विजय मान्य केल्याचा दावा करण्यात येत आहे. भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी सोशल मीडियावर क्लब हाउस प्लॅटफॉर्मवर झालेल्या प्रशांत किशोर यांच्या संभाषणाची ध्वनिफितच प्रसारित केली आहे. यात प्रशांत काही मोठय़ा पत्रकारांना तपशील पुरवत होते. भाजपने स्वतःच्या सुविधेनुसार अर्धवट ध्वनिफित प्रसारित केली आहे. अमित मालवी यांनी क्लब हाउसचे पूर्ण संभाषण सादर करावे असे आव्हान प्रशांत किशोर यांनी याप्रकरणी दिले आहे.
क्लब हाउसच्या एका सार्वजनिक चॅटमध्ये प्रशांत किशोर यांनी तृणमूल काँग्रेसच्या अंतर्गत सर्वेक्षणातही भाजप विजयी होताना दिसून येत असल्याचे म्हटले आहे. लोक मोदींना मतदान करत असून ध्रूवीकरण झाले आहे. बंगालच्या लोकसंख्येतील 27 टक्के अनुसूचित जातींचा समुदाय तसेच मतुआ समुदाय सर्व भाजपसाठी मतदान करत असल्याची कबुली प्रशांत यांनी यात दिली आहे.
मुस्लीम तुष्टीकरणाची कबुली
डावे पक्ष, काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसने स्थितीनुसार मागील 20 वर्षांमध्ये मुस्लिमांचे तुष्टीकरण केले आहे. याचमुळे तळागाळात आक्रोश दिसून येत असल्याचे प्रशांत किशोर यांनी म्हटल्याचे यात ऐकू येते. ही चॅट सार्वजनिक होत असल्याची जाणीव यात सामील कुणालाच नव्हती असा दावा मालवीय यांनी केला आहे.
देशभरात मोदी लोकप्रिय
मोदी हे बंगालच नव्हे तर देशात अत्यंत अधिक लोकप्रिय असून याबद्दल कुठलीच साशंकता नाही. देशभरता लोक त्यांचे म्हणणे ऐकत आहेत. तृणमूल काँग्रेसच्या विरोधात सत्ताविरोधी लाट आहे. तसेच मतांचे धुवीकरण हे देखील सत्य आहे. दलितांची मते महत्त्वाचा घटक असून भाजपचे तळागाळात कॅडर असल्याचे प्रशांत किशोर सांगत असल्याचे ध्वनिफितीतून समोर येते.
पीके निशाण्यावर
ध्वनिफित समारे आल्यावर भाजपने प्रशांत किशोर यांना लक्ष्य केले आहे. प्रशांत किशोर यांची व्यूहनीति बंगालमध्ये काम करणार नाही, त्यांची व्यूहनीति अपयशी ठरली आहे. बंगालमध्ये केवळ मोदींची व्यूहनीति उपयुक्त ठरणार असल्याचे उद्गार भाजप नेते राजीव बॅनर्जी यांनी काढले आहेत. तर प्रशांत किशोर देखील मोदी हेच सर्वोत्तम असल्याचे जाणतात. मोदींच्या नेतृत्वाखाली ‘सोनार बांग्ला’ निर्माण करण्यात येणार असल्याचा दावा भाजप नेत्या लॉकेट चटर्जी यांनी केला आहे.
प्रशांत यांचे प्रत्युत्तर
भाजपचे लोक स्वतःच्या नेत्यांच्या विधानांपेक्षा माझ्या क्लब हाउस चॅटला अधिक गांभीर्याने घेत असल्याचे पाहून मला आनंद होत आहे. चॅटचे काही हिस्से नव्हे तर पूर्ण संभाषण प्रसारित करण्याचे माझे त्यांना आवाहन आहे. भाजप बंगालमध्ये 100 हा आकडाही ओलांडू शकणार नसल्याचा दावा प्रशांत किशोर यांनी केला आहे.









