वर्षभराच्या प्रतीक्षेनंतर म्हैसूर-बेळगाव विश्वमानव एक्स्प्रेसही धावणार
प्रतिनिधी / बेळगाव
वर्षभराच्या प्रतीक्षेनंतर शनिवार दि. 10 पासून पुन्हा एकदा पॅसेंजर रेल्वे रुळावर येणार आहे. नैर्त्रुत्य रेल्वेने एकूण 3 पॅसेंजर रेल्वे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यापैकी बेळगाव-शेडबाळ-बेळगाव ही रेल्वे दि. 10 एप्रिलपासून तर हुबळी-शेडबाळ व बेळगाव-शेडबाळ या दोन पॅसेंजर सोमवार दि. 12 पासून धावणार आहेत. बऱयाच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पॅसेंजर धावणार असल्याने रेल्वे प्रवाशांमधून समाधान व्यक्त होत आहे.
बेळगाव-शेडबाळ-बेळगाव ही पॅसेंजर सकाळी 10 वा. बेळगाव रेल्वेस्थानकातून निघून सकाळी 11.15 वा. शेडबाळला पोहोचणार आहे. तर दुपारी 12 वा. शेडबाळ येथून निघून दुपारी 3.15 वा. बेळगावला पोहोचणार आहे. सुळेभावी, सुलधाळ, पाच्छापूर, पार्कनट्टी, गोकाक रोड, घटप्रभा, बागेवाडी, चिकोडी रोड, रायबाग, चिंचली, कुडची, उगार खुर्द असे थांबे देण्यात आले आहेत.
दोन पॅसेंजर 12 पासून होणार सुरू
हुबळी-शेडबाळ पॅसेंजर दि. 12 एप्रिलपासून धावणार आहे. सकाळी 11 वाजता हुबळी येथून निघालेली पॅसेंजर 12.46 वा. लोंढा, दुपारी 2 वा. बेळगाव तर सायंकाळी 5 वा. शेडबाळ येथे पोहोचणार आहे. सकाळी 7.30 वा. शेडबाळ येथून निघालेली रेल्वे 9.40 वा. बेळगाव तर दुपारी 2 वा. हुबळी येथे पोहोचणार आहे. बेळगाव-शेडबाळ पॅसेंजर दि. 12 एप्रिलपासून धावणार आहे. पहाटे 4 वा. बेळगाव येथून निघालेली रेल्वे सकाळी 6.35 वा. शेडबाळ येथे पोहोचणार आहे. तर सायंकाळी 5.30 वा. शेडबाळ येथून निघालेली रेल्वे रात्री 8.45 वा. बेळगावला पोहोचणार आहे.
म्हैसूर-बेळगाव एक्स्प्रेस आजपासून धावणार म्हैसूर ते बेळगाव या दरम्यान धावणारी विश्वमानव एक्स्प्रेस वर्षभरानंतर पुन्हा एकदा धावणार आहे. दि. 10 रोजी पहाटे 5.50 वा. ही रेल्वे म्हैसूर येथून निघणार असून रात्री 9.35 वा. बेळगावला पोहोचणार आहे. तर रविवारी पहाटे 5.20 वा. बेळगावमधून निघून रात्री 8.40 वा. म्हैसूरला पोहोचणार आहे. या एक्स्प्रेसमुळे बेळगाव-म्हैसूर मार्गावर प्रवास करणाऱयांना सोयीचे होणार आहे.









