एफआयएच प्रो हॉकी लीग
वृत्तसंस्था/ ब्युनॉस एअर्स
भारताच्या पुरुष हॉकी संघाला आंतरराष्ट्रीय स्तरावर वर्षभरानंतर खेळण्याची संधी मिळाली असून शनिवारी येथे एफआयएच प्रो हॉकी लीगमधील पहिला सामना यजमान व ऑलिम्पिक चॅम्पियन अर्जेन्टिनाविरुद्ध ते खेळणार आहेत. या लीगमध्ये एकूण दोन सामने होणार असून रविवारी दुसरा सामना होणार आहे.
बेंगळूरमधील भारतीय क्रीडा प्राधिकरणात शिबिरासाठी दाखल झाल्यानंतर कोरोना महामारीमुळे लॉकडाऊन जाहीर करण्यात आले होते. त्यामुळे जवळपास वर्षभर भारतीय खेळाडूंना या केंद्रावरच राहणे भाग पडले होते. यातून बाहेर पडल्यानंतर त्यांना आता प्रथमच उच्च स्तरावरील आंतरराष्ट्रीय सामना खेळण्याची संधी मिळाली आहे. गेल्या वर्षी भुवनेश्वरमध्ये प्रो हॉकी लीगमधील शेवटचा सामना भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला होता. या लीगमध्ये भारतीय संघ सध्या सहा सामन्यातून 10 गुण घेत पाचव्या स्थानावर असून भारताने 2 विजय मिळविले, 2 गमविले व 2 सामने अनिर्णीत राखले आहेत.
वर्ल्ड चॅम्पियन बेल्जियमने 13 सामन्यात सर्वाधिक 32 गुण नोंदवत आघाडीचे स्थान मिळविले आहे. त्यानंतर जर्मनी (8 सामन्यात 19 गुण), नेदरलँड्स (11 सामन्यात 18), ऑस्ट्रेलिया (8 सामन्यात 14) यांनी अनुक्रमे क्रम मिळविले आहेत. भारताला टोकियो ऑलिम्पिकपूर्वी अव्वल संघाविरुद्ध खेळण्याची चांगली संधी मिळाली असून बलाढय़ संघांविरुद्ध खेळण्याचा सराव त्यांना मिळणार आहे.
भारताने गेल्या फेबुवारीत हॉकीला कोरोना ब्रेकनंतर पुन्हा प्रारंभ करताना युरोप दौरा केला. तेथे जर्मनी व ग्रेट ब्रिटन संघांविरुद्ध दोन सामने अनिर्णीत राखले तर दोन सामने जिंकले. ऑलिम्पिकच्या तयारीच्या हेतूनेच या दौऱयाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र एफआयएच प्रो लीगमधील सामने उच्च दर्जाचे असल्याने भारताला ऑलिम्पिक तयारीच्या दृष्टीने ते खूप लाभदायक ठरणार आहेत. यावेळी त्यांचा प्रतिस्पर्धी अर्जेन्टिना असून शनिवारी व रविवारी सेरनार्ड स्टेडियमवर हे सामने होणार आहेत.
या लढतीआधी भारताने अर्जेन्टिनाविरुद्ध दोन सराव सामने खेळले असल्याने बऱयापैकी तयारी झाली आहे. भारताने पहिल्या सामन्यात 4-3 असा विजय मिळविला तर दुसरा सामना 4-4 असा बरोबरीत राहिला होता. या सामन्यातील कामगिरीने प्रशिक्षक ग्रॅहम रीड समाधानी असून दीर्घ काळानंतर खेळूनही कर्णधार मनप्रीत सिंग, वरुण कुमार, रुपिंदर पाल सिंग यांनी अचूक वेध घेण्यात यश मिळविले. विशेषतः आघाडीवीरांनी प्रभावी कामगिरी केली असून त्यांनी गोलच्या अनेक संधी निर्माण करून दिल्या होत्या. मनदीप सिंग, निलकांता शर्मा, दिलप्रीत सिंग यांनीही चांगली कामगिरी केली. मात्र बचाव भक्कम करण्याची गरज असल्याचे त्यांना वाटते. दोन्ही सराव सामन्यात भारताने आघाडी घेतल्यानंतरही अर्जेन्टिनाने मुसंडी मारण्यात यश मिळविले होते, असे त्यांनी सांगितले.
कर्णधार मनप्रीतही संघाच्या कामगिरीवर समाधानी असून प्रत्येक संधीचा लाभ घेण्यावर जास्तीत जास्त भर देण्याची गरज त्याने व्यक्त केली. ‘अर्जेन्टिनासारख्या बलाढय़ संघाविरुद्ध आमची कसोटी झाली, हे बरेच झाले. दोन्ही सामन्यात आम्ही उत्तम लढत दिली आणि अनेक संधी निर्माण केल्या. आम्हाला आणखी गोल नोंदवता आले असते आणि त्याचवेळी प्रतिस्पर्ध्याला कमी गोल द्यायला हवे होते. यासाठी बॅकलाईन अधिक भक्कम करावी लागेल आणि आक्रमणात आणखी धार आणण्याची गरज आहे,’ असे मनदीप म्हणाला.
गेल्या आठवडय़ात अर्जेन्टिनाला जर्मनीकडून दोन सामन्यात पराभूत व्हावे लागले होते. त्यामुळे भारताविरुद्धच्या सामन्यात त्यांच्यावरच जास्त दडपण असणार आहे. या दोन पराभवामुळे प्रो हॉकी लीगमध्ये अर्जेन्टिना सहाव्या स्थानावर घसरले आहे.









