विविध मागण्यांबाबत मुख्यमंत्र्यांचे वेधले लक्ष
प्रतिनिधी / ओरोस:
कमी मानधनात आपल्याकडून अतिरिक्त कामे करून घेतली जात असल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य गावकामगार पोलीस पाटील संघटना, शोध शाखा सावंतवाडी विभागाकडून करण्यात आला आहे. त्यांनी आपल्या विविध मागण्यांबाबत मुख्यमंत्री यांचे लक्ष वेधले आहे.
पोलीस पाटलांना दरमहा 12 हजार रुपये मानधन देण्यात यावे. प्रशिक्षण देण्यात यावे. नूतनीकरण कायमचे बंद करण्यात यावे. निवृत्ती वय 65 वषी करणे, सेवानिवृत्तीनंतर पेन्शन सुरू करणे किंवा निवृत्तीवेळी ठोस अशी रक्कम देण्यात यावी, शासनाकडून कायमस्वरूपी विमा कवच देण्यात यावे, कामकाज सुरू असताना अपघाती किंवा नैसर्गिक मृत्यू आल्यास वारसांना अनुकंपाखाली पोलीस पाटीलपदी नियुक्ती द्यावी. दोडामार्ग तालुक्मयातील घोडगेवाडी येथील पोलीस पाटील विश्राम दळवी हे तिलारी नदीच्या घोडगेवाडी येथील कालव्यावरुन घरी जाताना अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्याने वाहून गेले होते. त्यांच्या वारसांना नियुक्ती द्यावी, वजने व मापे पडताळणी कामी व्यापाऱयांना नोटीस पोचविण्याची जबाबदारी कमी करण्यात यावी, रिक्त पदे भरण्यात यावीत, राज्यपाल पुरस्कार देण्यात यावेत, शासनाने प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकांची काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी, सिंधुदुर्गातीलच पोलीस पाटलांवर हजेरी पत्रकाची होत असलेली सक्ती थांबवावी आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.
कोणताही अतिरिक्त भत्ता दिला जात नाही. वरील सर्व गोष्टीचा विचार करुन सहनुभूतीपूर्वक मागण्या मंजूर कराव्यात, अशी मागणी महाराष्ट्र राज्य गावकामगार पोलीस पाटील संघटना शाखा सावंतवाडी विभाग अध्यक्ष व वेंगुर्ले तालुका अध्यक्ष यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्याकडे सुपुर्द करण्यात आले. यावेळी विलास साटेलकर, मधुसुदन मेस्त्राr, नीलेश पोळजी, लक्ष्मण गावकर विजय नार्वेकर, बाबू गावडे, यशवंत खानोलकर, निकिता पोरमरे, ऋषिका नाईक आदी उपस्थित होते.
पोलिस पाटलांना कोरोना लसीकरण करावे!
कोरोना प्रतिबंधक लसीकरणात पोलीस पाटलांकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. शासकीय कर्मचाऱयांना तसेच सामान्य नागरिकांनाही लस देण्यात येत असताना पोलीस पाटलांना मात्र प्राधान्य दिले जात नाही अशी खंत व्यक्त करण्यात आली आहे. या बाबीची दखल घेऊन पोलीस पाटलांना कोरोना प्रतिबंधक लस प्राधन्याने देण्याबाबत कार्यवाही व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
भूमापनावेळी हजेरीबाबत मानधन मिळावे!
भूमी अभिलेख कार्यालयाकडून गावातील विविध ठिकाणी सार्वजनिक कारणासाठी तसेच खाजगी जमीनदाराच्या मागणीवरुन करण्यात येणाऱया भूमापनावेळी पोलीस पाटीलांना पूर्ण वेळ हजर राहण्याची सूचना दिली जाते. शासनाच्या विविध विभागांची कामे करत असताना त्याबरोबरीने भूमापनाच्या दिवशी संपूर्ण दिवसभर हजर राहून पोलीस पाटील सहकार्य करीत असतात. मात्र, सदर कामाचा कोणताही मोबदला अथवा भत्ता दिला जात नाही. याची दखल घेऊन पोलीस पाटलांना भूमापन कार्यात प्रत्यक्ष हजर राहून सहकार्य केल्याबाबत प्रतिदिन दराने मोबदला देण्यात यावा, अशी मागणीही करण्यात आली आहे.









