ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
दिल्लीत दिवसेंदिवस वाढत चाललेली रुग्ण संख्या लक्षात घेत केजरीवाल सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार राजधानी दिल्लीतील सर्व शाळा पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याची घोषणा करण्यात आली आहे.याबाबत माहिती देताना मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले की, कोविडचे वाढत चाललेली रुग्ण संख्या लक्षात घेऊन दिल्लीतील सर्व शाळा ( सरकारी आणि खाजगी), कॉलेज पुढील आदेशापर्यंत बंद राहतील.

दरम्यान, दिल्लीतील एका निवासी शाळेमध्ये दोन प्राचार्यांसह काही विद्यार्थ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यानंतर आज जेएनयूच्या 24 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. केवळ शाळांमध्येच नाही तर दिल्लीतील रुग्णालयांमधील स्टाफमध्ये देखील कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत आहे. त्यामुळे सरकारने हा निर्णय घेतला आहे.
- राजीव गांधी रुग्णालय सुपर स्पेशालिटी कोविड रुग्णालय म्हणून घोषित
राजधानी दिल्लीत वाढत चाललेली रुग्ण संख्या लक्षात घेत केजरीवाल सरकारने पुन्हा एकदा दुसऱ्यांदा राजीव गांधी रुग्णालय ‘सुपर स्पेशालिटी कोविड रुग्णालय’ म्हणून घोषित केले आहे. आता या रुग्णालयात केवळ कोरोना रुग्णांचाच उपचार केला जाणार आहे. याबाबतचे आदेश जारी करण्यात आले आहेत. यापूर्वी देखील गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात हे रुग्णालय कोविड रुग्णालय म्हणून घोषित केले होते. त्यानंतर जवळपास 9 महिने या रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचार करण्यात आले होते.









