प्रतिनिधी / बेळगाव
मजगाव येथील महालक्ष्मी देवीची ओटी भरण्याचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. दि. 30 मार्चपासून प्राणप्रतिष्ठापणेच्या कार्यक्रमाच्या आयोजनानंतर दि. 7 व 8 एप्रिल रोजी देवीची ओटी भरण्याचा कार्यक्रम संपन्न झाला.
बुधवारी मजगाव व परिसरातील भाविकांनी देवीचा जयघोष करत बँड, ढोल-ताशा, झांजपथक आदी वाद्यांसह भंडारा व गुलालाची उधळण करत दर्शनाचा लाभ घेतला. पिरनवाडी, खादरवाडी, हुंचेनट्टी गावातील नागरिकांनी भव्य मिरवणुकीसह ओटी भरून दर्शनाचा लाभ घेतला.
यात्रा कमिटीतर्फे दर्शनासाठी अत्यंत शिस्तबद्ध नियोजन केले होते. श्री लक्ष्मी देवीसाठी मजगाव, पिरनवाडी, खादरवाडी, हुंचेनट्टी व इतर भक्तांकडून सोन्या, चांदीचे दागिने अर्पण करण्यात आले. गुरुवारी पहाटेपासूनच दर्शनासाठी रांग लागलेली होती. भाविकांसाठी ठिकठिकाणी पाणपोई, शरबतची सोय केली होती. यात्रोत्सवावेळी हजारो भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला.